स्वातंत्र्यानंतर प्रथमच दुर्गम भागात तुमरकाेठीत बस सेवा सुरू झाली

    24-Mar-2026
Total Views |
 

blast 
 
स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतरही ज्या भागातील नागरिकांनी केवळ डाेंगरदऱ्या आणि पायवाटा पाहिल्या, तेथे आता पहिल्यांदाच राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचे दर्शन घडले. जिल्हा पाेलीस दलाच्या प्रयत्नांमुळे तुमरकाेठी ते अहेरी या मार्गावर 17 मार्च राेजी बससेवेचा दिमाखदार प्रारंभ झाला.भामरागडपासून 30 कि.मी. आणि अहेरीपासून 100 कि.मी.वर असलेल्या तुमरकाेठी गावात पहिली बस दाखल झाली तेव्हा गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. अबालवृद्धांनी पारंपरिक वाद्ये वाजवून आणि नृत्य करून बसचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी हातात राष्ट्रध्वज घेऊन ‘भारत माता की जय’च्या घाेषणा देत या विकास पर्वाचे स्वागत केले.
 
वर्षानुवर्षे केवळ खांद्यावरून आजारी माणसांना नेणारे किंवा डाेक्यावर ओझे वाहणारे गावकरी आता सन्मानाने बसने प्रवास करतील. गडचिराेली पाेलीस दल केवळ शस्त्रे घेऊन लढत नाही, तर विकासाची लेखणी घेऊन दुर्गम भागाचे भविष्य लिहीत असल्याचे या निमित्ताने दिसून आले. पाेलीस अधीक्षक नीलाेत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.माओवादग्रस्त भागात केवळ रस्तेच नाही, तर सुरक्षितता प्रदान करून पाेलीस दल जनसेवेचे काम करत आहे. या मार्गावर बस सुरू झाल्याने काेठी, तुमरकाेठी आणि परिसरातील नागरिकांचे जीवनमान सुसह्य हाेणार आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अहेरी किंवा गडचिराेलीला जाणे आता साेपे हाेणार आहे, असे पाेलीस अधीक्षकांनी सांगितले.