गुन्ह्यांच्या तपासासाठी एआयचा वापर हाेणार

    24-Mar-2026
Total Views |
 
 

AI 
 
अत्यंत गुंतागुंतीच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) आधार घेणारा राज्यातील पहिला प्रायाेगिक प्रकल्प नागपूर ग्रामीण पाेलीस दलाकडून राबवला जात आहे. यासाठी ‘महाक्राईमओएस’ या एआय प्लॅटफाॅर्मचा वापर केला जात आहे. या ऑपरेटिंग सिस्टीमच्या खरेदीसह इतर बाबींसाठी गृह विभागाने सुमारे 2 काेटींचा निधी मंजूर केला आहे. गुन्हे तपासासाठी या एआय प्लॅटफाॅर्मचा वापर येत्या काळात संपूर्ण राज्यात करण्याचे प्रस्तावित आहे.हा एआय प्लॅटफाॅर्म आता ‘महाक्राईमओएस’ म्हणून ओळखला जाताे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्राेसाॅफ्टचे सीईओ आणि अध्यक्ष सत्या नडेला यांच्या उपस्थितीत त्याची सुरुवात करण्यात आली.
 
अमलीपदार्थांशी संबंधित गंभीर गुन्हे, आर्थिक फसवणुकीची प्रकरणे, सायबर क्राईम आणि लैंगिक गुन्ह्यांच्या तपासाचे स्वरूप गुंतागुंतीचे असते.या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी तपास अधिकाऱ्याला अधिक मार्गदर्शनाची गरज असते. त्यामुळे ‘एआय’ तंत्रज्ञानाचा आधार घेऊन अशा गुन्ह्यांचा तपास करता येईल का, असा विचार गृह विभागाकडून सुरू हाेता. त्यातूनच नागपूर ग्रामीणमधील एआय आधारित तपासाचा हा प्रायाेगिक प्रकल्प पुढे आला.या प्लॅटफाॅर्मवर एखाद्या गुन्ह्याचा एफआयआर नाेंदवला, की ताे तपास अधिकाऱ्याला तपास टप्प्याटप्प्याने पुढे नेण्याबाबत मार्गदर्शन करताे.
 
अगदी तपासातील पत्रव्यवहारासाठी लागणारीपत्रेही त्यातील काे पायलटच्या मदतीने तयार करून मिळत असल्याने तपासाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि नीटनेटकी झाली आहे.या प्रकल्पासाठी नागपूर ग्रामीण पाेलीस दलात एकूण 133 पाेलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. तसेच, या एआय प्लॅटफाॅर्मचा आधार घेऊन आतापर्यंत 287 प्रकरणांचा तपास करण्यात आला आहे.मुख्यमंत्र्यांच्या शंभर व दीडशे दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांत नागपूर ग्रामीण पाेलीस दलाला यासाठी पुरस्कार मिळाले आहेत. आता गृह विभागाने या प्रकल्पासाठी 2 काेटींचा निधी दिला आहे. त्यातून प्रत्यक्षात ‘महाक्राईमओएस’ एआय ऑपरेटिंग सिस्टीमची खरेदी, तसेच ‘लीगल डेटा बेस’चा वापर करून हा प्लॅटफाॅर्म आणखी सक्षम करण्याचे नियाेजन आहे.