जगामधें जगमित्र । जिव्हेपासीं आहे सूत्र ।1।

    21-Mar-2026
Total Views |
 

saint 
 
ज्याला लाेकनेता व्हावयाचे आहे त्याने संवाद कला व लाेकसंग्रहता कशी प्राप्त करावी व त्यासाठी आपली वर्तणूक कशी ठेवावी याचे मार्गदर्शन श्रीसम र्थांनी एकाेणिसाव्या दशकाच्या ‘‘विवरण निरूपण’’ या दुसऱ्या समासात केलेले आहे. लाेकांशी सुसंवाद साधण्यासाठी शब्दभेद, अर्थभेद व प्रबंधभेद समजून घेणे अगत्याचे असते.एकच शब्द पण त्याचा उच्चार, त्यावेळचा आविर्भाव व संदर्भ यामुळे त्याचे वेगवेगळे अर्थ हाेतात. ‘‘या’’ असे म्हणताना वरील तिन्ही गाेष्टींच्या वेगळेपणाने स्वागत, हेटाळणी किंवा तुच्छता हे परस्परविराेधी भाव प्रगट हाेऊ शकतात. त्यामुळे हे भेदाभेद समजून घेणे अत्यावश्यक आहे. पूर्वपक्ष, उत्तरपक्ष, सिद्धांत,खंडणमंडणाचे बारकावे जाणावे आणि प्रत्यक्ष अनुभवाचेच बाेल बाेलावेत.गाळसाळ्यात अग्नी प्रज्वलित हाेत नाही. त्याप्रमाणे केवळ अनुमानधपक्याने बाेलण्याने लाेकांच्या अंतरात्म्याला जाग येत नाही. त्यासाठी प्रपंच आणि परमार्थ या दाेन्हींतही प्रत्यक्ष प्रचितीच्या आधारानेच बाेलावे.
 
काेठेही व काेणाशीही संवाद साधताना प्रश्न विचारणाऱ्या माणसाचा हेतू जाणून मगच उत्तर देणे आणि सभाेवतालच्या सर्वांच्या मनातील विचार सूक्ष्मपणे ओळखणे हेच चातुर्याचे लक्षण आहे. अशा चतुरपणाशिवाय बाेललेले सर्व निष्फळ ठरून सभेमध्ये समाधान न नांदता उगाचच वादविवाद व तणातणी निर्माण हाेते. अनेक लाेक जेव्हा बाेलत असतील तेव्हा सगळ्यांचे सर्व ऐकून घ्यावे; पण आपण मात्र गंभीरपणे माैन धारण करावे आणि त्या सर्वांचे बाेलणे, हावभाव व देहबाेली अशा छाेट्या छाेट्या गाेष्टींतून त्यांचे मनाेगत अचूक ओळखावे. उद्धटांशी भांडण, वाह्यात लाेकांचा संग आणि भ्रष्टाचारी लाेकांचा सहवास टाळावा. बाेलताना आपल्याकडे अज्ञानीपणा घेऊन हळुवारपणे मधुर भाषणाने बहुजनांना आपलेसे करावे. आपल्या हुशारीचा गर्व न धरता वेळवखत ओळखावा. जेव्हा अनेक जण वादविवाद करू लागतील तेव्हा आपली बाजू खरी असली तरी हुज्जत टाळावी व समुदाय बिघडू देऊ नये. जे रंजले गांजले व दु:खी असतील त्यांची व्यथा जाणून त्यावर मृदू शब्दांची व साहाय्यकारी कृतीची ुंकर घालावी.