आदिवासी संस्कृतीची समृद्ध परंपरा जपणारे तारपा वादन... तारपाच्या गजरात आदिवासी बांधवांनी सादर केलेल्या नृत्याने पुणेकरांची मने जिंकली. पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा आणि तारपा पथकाच्या तारपावादन व नृत्याच्या कार्यक्रमात एकात्मता, परंपरा आणि आनंदाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिराच्या 42व्या वर्धापन दिनानिमित्त गुढीपाडव्यापासून संगीत महाेत्सवाचा प्रारंभ झाला. बाजीराव रस्त्यावरील नूमवि प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयाेजित महाेत्सवाचे उद्घाटन महापाैर मंजूषा नागपुरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, काेषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमाेल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गाेडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. शिवराज कदम जहागिरदार, ज्येष्ठ गायक व संगीतकार श्रीधर फडके आदी उपस्थित हाेते. तारपा वादनानंतर श्रीधर फडके व सहकाऱ्यांचा ‘फिटे अंधाराचे जाळे’ हा कार्यक्रम झाला.भिकल्या धिंडा म्हणाले, की तारपा वाद्य माझ्या संस्कृतीची शान आहे आणि माझी संस्कृती जतन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. माझी खरी श्रीमंती म्हणजे माझे प्रेक्षक, चाहते आहेत. माणसाने कला जाेपासली पाहिजे आणि ती पुढे नेली पाहिजे.
दरम्यान, श्री गणेशनामाचा जयघाेष...फुलांची आकर्षक आरास...रांगाेळीच्या पायघड्या...बँडचे मंगलध्वनी अशा मंगलमय वातावरणात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गुढीपाडवा साजरा करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गुढीपाडव्याला मंदिराच्या प्रवेशद्वारात उभारण्यात आलेल्या भव्य गुढीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पहाटेपासूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी माेठ्या संख्येने गर्दी केली हाेती. परिमंडळ-1 चे पाेलीस उपायु्नत कृषिकेश रावले यांच्या हस्ते गणरायाची आरती करून गुढीपूजन करत गुढी उभारण्यात आली.