नाेटीस न देता नाेकरी साेडण्याचे प्रमाण वाढल आहे

    21-Mar-2026
Total Views |
 


job
 
 
 
पूर्वी नाेकरी साेडणे ही एक नियाेजनबद्ध प्रक्रिया असायची, ज्यामध्ये नाेटीस पिरीयड पाळला जायचा आणि काैतुकाचा निराेप समारंभ असायचा. मात्र, आज ते दुपारच्या वेळी अचानक लाॅग-ऑफ करत आहेत, नाेटीस न देता राजीनामा मेल करत आहेत आणि मागे वळूनही न पाहता बाहेर पडत आहेत.अशा ‘रिव्हेंज क्विटिंग’च्या (सूडापाेटी नाेकरी साेडणे) युगात आपण परत एकदा प्रवेश करत आहाेत. हा एक असा मनाचा कल आहे जाे करिअरच्या प्रगतीपेक्षा आत्मसन्मान मिळवण्याबद्दल अधिक आहे.रिव्हेंज क्विटिंग : ‘रिव्हेंज क्विटिंग’ म्हणजे कर्मचाऱ्यांनी विषारी (त्रासदायक) कामाच्या वातावरणाचा निषेध म्हणून, अनेकदा नाेटीस न देता अचानक नाेकरी साेडणे. रागाच्या भरात दिलेल्या राजीनाम्यापेक्षा हे वेगळे आहे कारण यात एक निश्चित हेतू असताे.
 
हे पगार वाढण्यासाठी नसून ऑफिस किंवा कंपनीला एक संदेश देण्यासाठी असते. मानसिक आराेग्य सल्लागार अंकिता पाॅल स्पष्ट करतात की, ‘आपल्यापैकी बहुतेकांनी कधी ना कधी नाेकरी साेडली आहे कारण आपल्याला थकल्यासारखे किंवा दुर्लक्षित राहिल्यासारखे वाटले असेल. पण एखादा मुद्दा पटवून देण्यासाठी नाेकरी साेडणे - म्हणजे रिव्हेंज क्विटिंग हाेय.’ अचानक संख्या वाढली : मार्च 2025 मध्ये 3,600 हून अधिक अमेरिकन कामगारांचे सर्वेक्षण करणाऱ्या माॅन्स्टर अहवालात असे दिसून आले, की 47 टक्के लाेकांनी निराशेपाेटी नाेटीस न देता नाेकरी साेडल्याची कबुली दिली, तर 57 टक्के कर्मचाऱ्यांनी इतरांना असे करताना पाहिले, म्हणून स्वतः केले आहे.
 
काेराेना महामारीनंतर अनेक लाेकांना कामात शिथिलता, सहानुभूती व कामाच्या संतुलनाचे आश्वासन देण्यात आले, परंतु, प्रत्यक्षात तसे झाले नाही. ऑफिसमधूनच काम करणे, कामाचा वाढता ताण, न वाढणारा पगार अशा अनेक नकारात्मक भावना साठत जात हाेत्या. अंकिता पाॅल यांच्या मते, ‘रिव्हेंज क्विटिंग बाहेरून पाहताना अचानक झालेले वाटू शकते, पण ते तसे नसते. लाेक सहसा बराच काळ शांतपणे सहन करतात. जेव्हा मर्यादा वारंवार ओलांडल्या जातात आणि याेग्यतेची दखल घेतली जात नाही, तेव्हा नाेकरी साेडणे हाच स्वाभिमान परत मिळवण्याचा एकमेव मार्ग उरताे. अनेक कर्मचारी विचार मांडत नाहीत, स्पष्टीकरण देत नाहीत आणि परिस्थिती बदलेल, यावर त्यांचा विश्वास संपताे. नाेकरी साेडून देणे, हाच त्यांना त्यांच्या सुटकेचा मार्ग वाटताे.’
 
सूडामागचे मानसशास्त्र : समुपदेशन मानसशास्त्रज्ञ डाॅ. देवांशी देसाई एका सखाेल पैलूवर प्रकाश टाकतात, ‘सूडाकडे भावनिक सुटका म्हणून पाहिले जाते. परंतु संशाेधनातून दिसून आले आहे, की यामुळे क्वचितच कायमस्वरूपी समाधान मिळते. कामाच्या ठिकाणी, रिव्हेंज क्विटिंगमध्ये एक सूडाचा भाग असताे, कारण कर्मचाऱ्याला कंपनीला त्या नुकसानीची जाणीव करून द्यायची असते. परंतु, हा हेतू साध्य हाेईलच असे नाही. डाॅ. देसाई असेही नमूद करतात की, ‘कर्मचारी त्यांच्या राजीनाम्याच्या कथा ऑनलाइन शेअर करत आहेत. हे जरी सक्षम करणारे वाटत असले तरी, ते अनेकदा बरे न झालेल्या जखमांचे लक्षण असते. वास्तविक अशा कृतींना कंपन्यांनी धाेक्याची सूचना समजावे कारण कर्मचाऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज असते.
काही कर्मचारी त्यांच्या व्यथा साेशल मीडियावर मांडतात, त्यामुळे मनाला झालेली जखम बरी हाेण्याऐवजी काही काळ बरे वाटते.’
 
 रिव्हेंज क्विटिंग सक्षम की जाेखमीचे? येथे चर्चा गुंतागुंतीची हाेते.एकीकडे, रिव्हेंज क्विटिंग हे मुक्त करणारे वाटू शकते, विशेषतः जे लाेक अत्यंत खराब वातावरणात काम करत हाेते त्यांच्यासाठी.दुसरीकडे, अचानक नाेकरी साेडल्यामुळे आर्थिक ताण आणि करिअरमधील अस्थिरता यांसारखे दीर्घकालीन परिणाम हाेऊ शकतात. अनेकदा, आधीची नाेकरी साेडल्यावर दुसरी मिळत नाही आणि व्यक्तीवर करिअर विषयीचा ताण वाढतच जाताे. तज्ज्ञांच्या मते, मूळ समस्या नाेकरी साेडणे, ही नसून कर्मचारी त्या टाेकाला का पाेहाेचतात, ही आहे. जेव्हा कर्मचारी मिळत असलेली वागणूक सहन करण्यापेक्षा प्रतिष्ठेला महत्त्व देतात, तेव्हा ताे संस्थात्मक संस्कृतीचा पराभव असताे.
 
 ऑफिसेस/कंपन्यांनी समजून घ्यावे : रिव्हेंज क्विटिंगकडे दुर्लक्ष करू नका; हा एक फीडबॅक आहे, स्पष्टपणे समाेर आलेला आणि नकारात्मक. कामाचा अतिताण, कामाची दखल घेण्याचा अभाव, संवाद नसणे आणि लवचिक कामाची पद्धत नसलेली व्यवस्था, या लाटेच्या मुळाशी आहेत. रिव्हेंज क्विटिंगला जर कर्मचाऱ्यांची दुर्बलता मानत राहिले, तर कंपनीचे न भरून येणारे नुकसान हाेईल. डाॅ. देसाई म्हणतात, ‘कंपन्यांनी रिव्हेंज क्विटिंगकडे नाटकी म्हणून न पाहता याकडे लक्ष द्यावे की, कर्मचाऱ्यांमध्ये एवढा असंताेष शांतपणे वाढत जाण्याची कारणे काय हाेती?’