ब्रिटनमधील लीड्स शहराच्या न्यायालयात एका आयरिश महिलेने तक्रार दाखल केली आहे की, तिचा बाॅस तिला वारंवार बटाटा म्हणून हिणवत असे, ज्यामुळे तिला मानसिक त्रास झाला. ही घटना अशी आहे की, बेनेडेट हेस नावाची एक महिला एका सिव्हिल इंजिनिअरिंग कंपनीत बुककीपर म्हणून काम करत हाेती. तिचा बाॅस, मिक ऍटकिन्स, तिच्या आयरिश ओळखीमुळे तिची थट्टा करायचा. जेव्हा कधी ती एखाद्या गाेष्टीशी असहमत असायची, तेव्हा मिक तिला ‘पाेटॅटाे’ म्हणायचा.कधी कधी ताे तिला ‘पॅडी’ किंवा ‘स्टुपिड पॅडी’ असेही म्हणायचा. इतर कर्मचाऱ्यांसमाेर सार्वजनिक ठिकाणी अशा संबाेधनांचा वापर करत असल्यामुळे, इतर कर्मचारीदेखील तिला हलक्यात घेऊ लागले. बेनेडेटने ठरवले की ती असा मानसिक छळ सहन करणार नाही. तिला उद्देशून केलेल्या संबाेधनांविरुद्ध तिने निषेध नाेंदवला आणिकंपनीकडून मानसिक छळाबद्दल नुकसान भरपाईची मागणी केली. राेजगार न्यायाधिकरणानेही अशी संबाेधने वांशिक छळाच्या श्रेणीत येतात हे मान्य केले आणि कामाच्या ठिकाणी अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याबद्दल कंपनीला 29 लाख रुपयांचा दंड भरण्याचा निर्णय दिला.