ऐसा ग्रंथ जपाेनी ल्याहावा । प्राणीमात्रांस उपजे हेवा ।1।

    19-Mar-2026
Total Views |
 

saint 
 
एकाेणिसाव्या दशकाचे नावच मुळी ‘‘शिकवणदशक’’ असून, त्यातील दहाही समासातून श्रीसम र्थांनी लेखनापासून, प्रयत्नवाद, बुद्धिवाद, विवेकवाद ते थेट राजकारण अशा सर्व विषयांवर अतिशय मूलभूत व माेलाचे मार्गदर्शन केलेले आहे.ज्याला आयुष्यात काहीतरी भक्कम कार्य करावयाचे आहे अशा प्रत्येकाने अगदी ज्याचा देवावर विश्वास नाही अशा नास्तिकानेही हा दशक मुळात वाचल्यास त्याला अलभ्य शिकवण मिळून लाभ हाेणारा आहे.या दशकातील पहिला समास ‘लेखनक्रिया निरूपण’ हा असून, त्यात श्रीसमर्थांनी कागदाचा व शाईचा कसा वापर करावा, अक्षरांचे आकार व वळण कसे असावे येथपासून ते ग्रंथ कसा सजवावा आणि पूर्ण झाल्यावर जपून कसा ठेवावा येथपर्यंत सखाेल व स्वानुभवाचे मार्गदर्शन केलेले आहे. विद्याभ्यास करणाऱ्याने आपले अक्षर घाेटून सुंदर करावे म्हणजे त्याचे लेखन पाहूनही हुशार माणसांना आनंद हाेताे.
 
अक्षर कसे असावे हे सांगताना श्रीसमर्थ म्हणतात, अक्षर वाटाेळे, सरळ आणि माेकळे असून काळ्याभाेर शाईने लिहिलेल्या ओळी जणू माेत्याच्या माळेप्रमाणे दिसल्या पाहिजेत.दाेन अक्षरे व शब्द यामध्ये याेग्य अंतर ठेवून काना, मात्रा, ऊकार, वेलांट्या व रारही नीट असाव्यात.लेखनाच्या प्रारंभापासून शेवटपर्यंत एकच वळण असून, जणू एकटाकीच संपूर्ण ग्रंथ लिहिला आहे असे वाचकाला वाटले पाहिजे. शिसपेन्सिलीने दाेन ओळींम ध्ये याेग्य अंतर ठेवून त्या समांतर आखून घ्याव्यात.म्हणजे त्या एकमेकांत मिसळत नाहीत.काेठेही अडणार नाही, शुद्धलेखनाची काेणतीही चूक नाही, असे काळजीपूर्वक लिहिले पाहिजे.तरुणपणी बारीक अक्षरे वाचता येतात, पण म्हातारपणी ते शक्य हाेत नाही, म्हणून अक्षराचा आकार मध्यम असावा. दाेन्ही बाजूला समास साेडावेत, म्हणजे कालांतराने कागद जीर्ण हाेऊन काेपरे उडू लागले तरी लेखनाला बाधा येत नाही. लांबून पाहिला तरी ग्रंथ वाचण्याचा माेह हाेईल इतके सुरेख लेखन असावे.