पश्चिम आशियातील लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य इंधन टंचाईचा धाेका लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे; तसेच गॅस सिलिंडरची अवैध साठेबाजी अथवा घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठाेर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी डाॅ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिला. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची आढावा बैठक झाली.केंद्राने अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा (एस्मा) लागू केला असून, गॅस वितरणासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यातआला आहे. त्यामुळे पुरवठ्यावर काेणताही परिणाम हाेऊ नये यासाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकाेर पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. घाबरून जाऊन अनावश्यकपणे गॅस सिलिंडरची नाेंदणी करू नये.आवश्यकतेनुसारच सिलिंडर बुक करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.ठाणे जिल्ह्यात सुमारे 2 लाख 27 हजार 742 घरगुती आणि 4430 व्यावसायिक गॅस जाेडणीधारक आहेत. जिल्ह्यात 13 प्रमुख गॅस एजन्सी कार्यरत असून, त्यांच्यामार्फत राेज सरासरी 5922 घरगुती आणि 622 व्यावसायिक सिलिंडरची आवश्यकता असते. अवैध वापर आणि साठेबाजी राेखण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली विशेष पथके तैनात करण्यात आली असून, आतापर्यंत विविध ठिकाणी 121 हून अधिक छापे टाकून तपासणी करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.