कष्ट व प्रयत्नांच्या अशा अमूल्य महत्त्वाबराेबरच आर्थिक व्यवहारासंबंधीही श्रीसमर्थ एक अतिशय महत्त्वाचा उपदेश करतात.इतर संत आणि श्रीसमर्थ यांच्या दृष्टीकाेनातच फरक आहे. श्रीसमर्थांचा परमार्थकारणावर भर आहेच; पण ताे करण्यासाठी आधी प्रपंचही नेटका असणे त्यांच्या दृष्टीने आवश्यक आहे.नेटका प्रपंच करण्यासाठी सर्व कर्तव्ये नीट पार पाडली पाहिजेत व त्यासाठी सन्मार्गाने पुरेसे पैसे मिळविले पाहिजेत. याबराेबरच श्रीसमर्थ बचतीचे महत्त्वाचे सूत्र सांगताना म्हणतात, की मिळवलेले सर्व खाऊन संपवून टाकले, तर पुढे अडचणीच्या काळात मरायची पाळी येते.यासाठी मिळवल्यापैकी थाेडे शिल्लक टाकण्याची दूरदृष्टी ठेवावी, म्हणजे कठीण प्रसंगात ही बचत कामी येते.
आज एकविसाव्या शतकात आपण ठसवू पाहणारे अल्पबचतीचे महत्त्व श्रीसम र्थांनी साडेतीनशे वर्षांपूर्वीच ओळखून समजावले हाेते, ही त्यांच्या द्रष्टेपणाची साक्षच आहे.इहलाेकीच्या प्रपंचात ही बचत आणि परलाेकीच्या परमार्थ मार्गात साधनेची शिदाेरी नसेल, तर मनुष्यजन्मच व्यर्थ हाेताे. हा सर्व उपदेश न पाळणारा करंटा असून त्याची लक्षणे विचक्षक उत्तम पुरुषांना समजतात; परंतु करंट्याला मात्र चांगुलपणाची उत्तम लक्षणे समजूनही येत नाहीत हे दुर्दैव आहे. त्या करंट्याला आपली कुबुद्धी हीच सद्बुद्धी वाटते आणि त्याची वाट लागते.एखाद्या शुद्धीत नसलेल्या माणसाप्रमाणे त्या करंट्याचे बाेलणे आणि वागणे असते आणि विचार प्रक्रियेलाही ताे पारखा हाेताे. हे सर्व ओळखून साधकाने टाळावे व गुणसंवर्धन व प्रयत्नवादाची कास धरून विवेक, विचार आणि कृतिशीलतेने इहलाेक आणि परलाेक दाेन्हींकडे यशस्वी व्हावे, असे सांगून श्रीसमर्थ हा समास पूर्ण करतात.