आता लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित

    04-Feb-2026
Total Views |
 

Railway 
 
पश्चिम रेल्वेवरील लांब पल्ल्याचा प्रवास आता अधिक सुरक्षित झाला आहे.पश्चिम रेल्वे प्रशासनाने विरार-बडाेदासुरत या मार्गावर स्वदेशी ट्रेन संरक्षण प्रणाली ‘कवच’ नुकतीच कार्यान्वित केली आहे. प्रभारी महाव्यवस्थापक, पश्चिम रेल्वे, प्रदीप कुमार यांच्या हस्ते कवच तंत्रज्ञान असलेली पहिली गाडी दादर-भुज सयाजीनगर एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यामुळे मुंबई- गुजरात- दिल्ली या सर्वाधिक प्रवासी मागणी असलेल्या मार्गावर अंशतः कवच यंत्रणा सुरू झाली आहे.पश्चिम रेल्वेवरील विरार- बडाेदासुरत हा 344 कि.मी.वर कवच प्रणाली कार्यान्वित करण्याचे काम जानेवारी 2023 मध्ये सुरू हाेऊन तीन वर्षांत पूर्ण झाले. यासाठी 397 काेटी रुपये खर्च करण्यात आले. यापूर्वीच बडाेदा अहमदाबाद विभागात कवच प्रणाली कार्यान्वित करण्यात आली हाेती. त्यामुळे आता पश्चिम रेल्वेवर एकूण 435 मार्ग कि.मी. कवच यंत्रणेच्या सुरक्षा कक्षेत आला आहे.
 
अपघात टाळण्यासह सिग्नल ताेडून गाडी पुढे जाण्यापासून प्रतिबंध, वेगमर्यादेचे उल्लंघन राेखणे, रेल्वे फाटकावर स्वयंचलित सूचना देणे, धुके, कमी दृश्यमानता व प्रतिकूल हवामानात लाेकाे पायलटला मदत व्हावी यासाठी कॅबमध्ये सिग्नलची माहिती दाखवणे अशा वैशिष्ट्यांचाही कवचमध्ये समावेश आहे.विरार-बडाेदा विभागात कवचसाठी विविध टप्प्यांत कामे करण्यात आली.प्रत्येक स्थानक आणि स्वयंचलित सिग्नलिंग विभागासाठी स्वतंत्र सिग्नलिंग याेजना तयार करणे, रुळांवर आठ हजारांहून अधिक रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडी टॅग बसवणे, स्थानके आणि इंजिनांमध्ये सातत्यपूर्ण रेडिओ संपर्कासाठी नियाेजनासाठी 57 रेडिओ कम्युनिकेशन टाॅवर्स उभारण्यात आले असून, स्थानकांवर आवश्यक उपकरणे बसवण्यात आली आहेत.विरार-मुंबई सेंट्रल विभागातील कवच यंत्रणा येत्या सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य यात ठेवण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेवर 2667 कि.मी. अंतरात कवच यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी 1435 काेटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.पुढील टप्प्यात आणखी 2476 मार्गासाठी प्रस्ताव विचाराधीन आहेत, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.