दहा मेट्राे मार्गिकांसाठी एमएमआरडीएला 348 काेटी रुपयांची मदत

    27-Feb-2026
Total Views |
 

Metro 
 
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) 337 कि.मी.हून अधिक लांबीचे मेट्राेचे जाळे विणले जात आहे. या प्रकल्पातील काही मार्गिकांची कामे सध्या सुरू आहेत. निर्माणाधीन मेट्राे मार्गिकांसाठी दुय्यम कर्जाच्या रूपाने राज्य सरकारने एमएमआरडीएला 348 काेटींचा निधी दिला आहे. एकूण 10 मेट्राे मार्गिकांसाठी हा निधी देण्यात आला आहे. परिणामी या मेट्राे मार्गिकांच्या कामाला गती मिळणार आहे.एमएमआरडीएकडून सध्या मेट्राे 4, मेट्राे 4 अ (वडाळा ठाणे कासारवडवली गायमुख), मेट्राे 2 ब (अंधेरी पश्चिम मंडाले), मेट्राे 5 (ठाणे भिवंडी कल्याण), मेट्राे 6 (स्वामी समर्थ नगर कांजूरमार्ग), मेट्राे 7 अ (गुंदवली मुंबई विमानतळ), मेट्राे 9 (दहिसर मिरा-भाईंदर), मेट्राे 12 (कल्याण तळाेजा) या मार्गिकांची कामे ुरू आहेत.
 
टप्प्याटप्प्याने मार्गिकांची कामे करण्यात येत असून, जसजसे टप्पे पूर्ण हाेतील तसतसे ते सेवेत दाखल केले जाणार आहेत. चालू मेट्राे मार्गिकांची कामे निश्चित वेळेत पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएकडून कामांना गती देण्यात येत आहे. मात्र, एमएमआरीडएला निधीची चणचण भासते.राज्य सरकारकडून उपलब्ध हाेणाऱ्या दुय्यम कर्जामुळे निधीची चणचण काहीशी दूर हाेते.त्यानुसार राज्य सरकारने आता 10 मेट्राे मार्गिकांसाठी दुय्यम कर्ज उपलब्ध करून देत मेट्राे मार्गिकांना अर्थबळ दिले आहे. दुय्यम कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेल्या 10 पैकी सात मेट्राे मार्गिकांची कामे सध्या सुरू आहेत, तर एका मार्गिकेचे काम सुरू हाेणे बाकी असून, दाेन मार्गिकांची कामे पूर्ण झाली आहेत.