दुल्लभ शरीरीं दुल्लभ आयुष्य। याचा करू नये नास ।।2।।

    26-Feb-2026
Total Views |
 
 
saint
 
अशी तळमळ लागणे हे सुधारण्याचे प्रसाद चिन्हच आहे असे सांगून प्रयत्नाने असा माणूसही उन्नत अवस्थेला जाऊ शकताे, असा विश्वास देऊन श्रीसमर्थ त्यासाठी मार्गदर्शन करतात. ते म्हणतात अशा माणसाने आधी दृढ निश्चय करून, मन एकाग्र करून, निश्चयाने साधनेला सुरुवात करावी. आळस साेडून विवेक व विचाराने सतत प्रयत्नांची पराकाष्ठा करावी.आपले सर्व अवगुण साेडून उत्तम गुण अभ्यासून ते घ्यावेत. उत्तम ग्रंथ वाचून त्याचे सार आचरणात आणावे. श्लाेक, पदे यांचे पाठांतर करावे व ते याेग्य वेळी वापरून सर्वांना आनंद द्यावा.बाष्कळपणे गप्पा न मारता वेळप्रसंग पाहून याेग्य व माेजके बाेलावे. ऐकणाऱ्यांची आवड व कुवत ओळखून त्यांना रंगवून टाकेल असेच भाषण असावे. ज्याचा आपला पूर्ण अभ्यास असेल तेच सांगावे. गायनातून सांगायचे झाल्यास गायन सुस्वर व तालरागबद्ध असावे.
 
वेळप्रसंग पाहून संगीताचा व साहित्याचा सुयाेग्य वापर करून धडाक्याने हरिकथा करून भगवंताला आळवीत राहावे. सद्विचारी गद्यपद्याचे उदंड पाठांतर असावे आणि ते सदैव सतेज राहण्यासाठी त्याची उजळणी करीत असावे. आपण पूर्वी काय सांगितले आहे याचे स्मरण ठेवून त्या अनुषंगाने व संदर्भानेच पुढील मांडणी करीत जावे. अभ्यासासाठी लाेकांत साेडून एकांतात जावे. तेथेउत्तमाेत्तम ग्रंथांचा धांडाेळा घेऊन त्यांचे मनन आणि चिंतन करावे आणि आपल्या स्वानुभवाने त्या ग्रंथातील विचारांची पडताळणी करावी.त्यातील जे विचार प्रचितीच्या कसाेटीवर उतरतील ते मनात दृढ करावेत. अशा तऱ्हेने सद्गुणांची जाेपासना निस्पृहपणे करावी हे सांगून श्रीसमर्थ आणखी एक महत्त्वाचा उपदेश करतात. असा जाे निस्पृह महंत हाेईल त्याने समाजापासून विलग न राहता लाेकांमध्ये मिसळावे व त्यांना उपदेश करून त्यांनाही निस्पृह बनविण्याचा सतत प्रयत्न करावा. असे केल्यानेच ताे महंत आपल्या ईश्वरदत्त कर्तव्याला जागल्याचे श्रेय प्राप्त करेल असे सांगून श्रीसमर्थ हा समास पूर्ण करतात.