ओशाे - गीता-दर्शन

    21-Feb-2026
Total Views |
 
 
 
Osho
 
प्रश्न - भगवानश्री, या श्लाेकातील आणखी दाेन गाेष्टी अधिक स्पष्ट हाेतील तर बरं हाेईल. पहिली गाेष्ट - ध्यानाच्या आसनासाठी कुश दर्भ, मृगाजिन व वस्त्र यांचा क्रम ठेवण्यात आला. दुसरी गाेष्ट, शुद्ध भूमीचा उपयाेग सांगितला आहे. या दाेन गाेष्टींवर प्रकाश टाकावा.
कुशाचा, दर्भाचा ध्यानासाठी खूपच उपयाेग केला गेला आहे, बऱ्याच कारणांनी. एक तर पृथ्वीवर ज्या दिवसांमध्ये ध्यान-प्रक्रिया विकसित हाेत हाेती, जेव्हा ध्यानाची सुरुवात हाेत हाेती, आविष्कार हाेत हाेता, त्या क्षणाशीच दर्भाचा, कुशाचा खूपसा संबंध आहे. त्यावेळचा ‘कुशल’ हा शब्द अजूनही आपणाजवळ आहे. हा कुशपासूनच बनवलेला शब्द आहे. आपण एखाद्याबद्दल म्हणताे, ‘हा कुशल ड्रायव्हर आहे’ किंवा, ‘कुशल अध्यापक आहे’ पण या ‘कुशल’ चा काय अर्थ आहे, कधी विचार केलात का?
 
कुशल याचा एकंदर अर्थ एवढाच बराेबर ‘कुश’च धुंडाळून आणणारा. सगळीच गवतं कुश नसतात. तेव्हा या पृथ्वीवर ध्यान माेठ्या प्रमाणावर चालत हाेतं, विशेषतः या देशात! अन् जेव्हा ध्यानाच्या प्राथमिक चरणांचं उद्घाटन आपण केलं हाेतं तेव्हा कुशल हे विशेषण अशा एखाद्यासाठी वापरलं जाई, जाे हजाराे प्रकारांच्या गवतातून ध्यानाला सहाय्यक हाेईल असंच गवत निवडून आणू शकत असे. एक गवत अशा विशेष गुणधर्माचे आहे की ते आपल्याबराेबर एक विशेष प्रकारचं वातावरण घेऊन येतं, एक विशेष ताजेपण आणतं.आपल्याला किती तरी वेळा हा अनुभव येताे की काही गाेष्टींची उपस्थिती उत्प्रेरकाचं, कॅटॅलिटिक एजंटचं काम करते. आपल्या चहूकडे फुलं पसरली, सगळीकडे एक सुगंध शिंपडून ठेवला, आपल्याभाेवती धूप जाळत ठेवला तर मग आपण आता एका विशेष उपस्थितीनं वेढले जाता.