ईश्वरें नाना भेद केले। भेदें सकळ सृष्टी चाले।2।

    17-Feb-2026
Total Views |
 
 

saint 
 
असे लाेक नाशवंत वस्तूलाच अविनाशी म्हणतात.खरे आणि खाेटे, सार आणि असार सगळे सारखेच म्हणतात.अशा नतद्रष्टांना उत्तम वस्तूची म्हणजे परमार्थाची पारखही करता येत नाही, मग त्याची साधना लांबच राहिली. श्रेष्ठ काय आणि कनिष्ठ काय हे न कळून त्या सर्वांना सारखेच मानणाऱ्या अशा भाेंगळ माणसांना श्रीसमर्थ टाेणपे म्हणून त्याज्य ठरविताना म्हणतात - टाेणपा नव्हे गुणग्राहिक । मूर्खास कळेना विवेक । विवेक आणि अविवेक । येकचि म्हणती ।।16।। असे टाेणपसिद्ध गुणग्राहक नसून मूर्ख असतात. त्यांना विवेकबुद्धी नसल्याने ते विवेक व अविवेकसुद्धा एकच म्हणतात. पाप आणि पुण्य, सत्कर्म आणि कुकर्म, अमृत आणि विष, स्वर्ग आणि नरक एकच म्हणणाऱ्या अशाटाेणपसिद्धांपासून लांबच राहिले पाहिजे.
 
त्यांच्याजवळ विवेक नसल्याने त्यांचे सर्व सांगणे निरर्थक असते आणि त्यामुळे त्यांची आणि त्यांच्या नादी लागणाऱ्यांचीही फजिती आणि दुष्कीर्तीच हाेते. परमार्थमार्ग नेमका आणि विवेकी माणसालासुद्धा कळणे व आचरणे अवघड आहे, ताे या बाष्कळ टाेणप्यांना काेठून साध्य हाेणार? ज्या मार्गामध्ये डाेळसांची सुद्धा फसगत हाेऊन गाेंधळ उडताे तेथे आंधळ्याचे काय चालणार? असे सांगून परमार्थमार्ग कसा साधावा हे श्रीसमर्थ सांगतात. ते म्हणतात आधी आचरण शुद्ध व नीतिमान ठेवावे व नंतर विचारशील विवेक अंगी बाणवावा. संतांची संगत धरून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे, उत्तम गुणांचा अभ्यास करून ते घ्यावेत. सत् शास्त्रांचा धांडाेळा घ्यावा.