सिंधुदुर्ग जिल्हा जलवाहतुकीद्वारे मुंबईशी जाेडण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम लवकरच सुरू हाेत आहे. एम टू एम प्रकल्पांतर्गत विजयदुर्ग ते मुंबई हा प्रवास केवळ साडेचार तासांत पूर्ण हाेईल, अशी घाेषणा पालक मंत्री नितेश राणे यांनी केली. जिल्हा नियाेजन समितीच्या बैठकीत ते बाेलत हाेते. यावेळी आमदार दीपक केसरकर, नीलेश राणे, ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी तृप्ती धाेडमिसे आदी अदिकारी उपस्थित हाेते. बैठकीत जिल्ह्यासाठी 600 काेटींचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला. दावाेस करारांतर्गत जिल्ह्यात 4500 काेटींची गुंतवणूक हाेणार असून, त्यामुळे स्थानिकांना राेजगाराच्या संधी उपलब्ध हाेतील, असेही राणे यांनी नमूद केले.
आमदार दीपक केसरकर यांनी मांडलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात वनपर्यटनाला चालना दिली जाणार आहे.पारपाेलीच्या धर्तीवर इतर ठिकाणीही ट्री हाऊस उभारणे, पावसाळी धबधब्यांच्या पर्यटनाचे नियाेजन आणि हेलिटूरिझम प्रकल्प राबवण्यावर बैठकीत भर देण्यात आला; तसेच चिपी विमानतळाचा उडाण याेजनेत समावेश करण्याची मागणीही लावून धरण्यात आली. सध्याच्या परीक्षेच्या काळात वीजपुरवठा खंडित हाेणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना महावितरणला देण्यात आल्या. जिल्ह्यात स्वच्छता माेहीम अधिक प्रभावी करण्यासाठी इंदूर येथील उपक्रमांचा अभ्यास केला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील अधिकारी व पत्रकारांचा अभ्यास दाैरा आयाेजिण्यात येणार असल्याचे राणे यांनी सांगितले.