सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीसाठी वर्षाची मुदतवाढ कायम

व्यापारी आणि ग्राहकहितासाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

    05-Nov-2026
Total Views |

ChabdrashekharBawankule 
मुंबई, 4 नाेव्हेंबर (आ.प्र.) :
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीसाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले हाेते. त्याची अंमलबजावणी करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाेपर्यंत कार्यपद्धती निश्चित हाेत नाही ताेपर्यंत एक वर्षाची सूट कायम ठेवण्यात यावी, असा निर्णय घेतला आहे.
 
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयामुळे पारंपरिक पद्धतीने खाद्यतेल विक्री करणाऱ्या राज्यातील व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय सुरू ठेवता येणार असून, या कालावधीत सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीबाबत सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून व्यवहार्य धाेरण निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात या संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीस अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.
 
सुट्या खाद्यतेल विक्रीवर निर्बंध लागू करण्याच्या निर्णयामुळे राज्यातील पारंपरिक खाद्यतेल व्यापारी, लहान दुकानदार आणि ग्राहकांत निर्माण झालेल्या प्रश्नांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः दिवाळीच्या काळात खाद्यतेलाची मागणी माेठ्या प्रमाणात वाढत असल्याने व्यापाऱ्यांना व्यवसाय करताना अडचणी येऊ नयेत आणि ग्राहकांनाही खाद्यतेल सहज उपलब्ध व्हावे, याबाबत शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पारंपरिक व्यवसायांचे सातत्य टिकावे आणि ग्राहकांच्या आराेग्याशी काेणतीही तडजाेड हाेऊ नये, अशी शासनाची भूमिका असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
 
खाद्यतेलातील भेसळ राेखणे, ग्राहकांना सुरक्षित, दर्जेदार खाद्यतेल उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता आहे. मात्र, त्याचवेळी अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या छाेट्या व्यापाऱ्यांचाही विचार हाेणे आवश्यक आहे. त्यामुळे अन्नसुरक्षेच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करताना व्यापाऱ्यांवर अनावश्यक आर्थिक किंवा व्यावसायिक भार पडणार नाही, यासाठी याेग्य समन्वय साधण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले. या एक वर्षाच्या मुदतीत संबंधित व्यापारी संघटना, अन्न व औषध प्रशासन आणि इतर संबंधित घटकांशी चर्चा करून सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीबाबत सर्वसमावेशक, व्यवहार्य धाेरण तयार करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यासाठी सर्वसमावेशक समितीही स्थापन केली जावी. दिवाळीच्या काळात व्यापारी आणि ग्राहक दाेघांनाही दिलासा मिळावा.