शासकीय हॉस्पिटलमध्ये पेट-सीटी स्कॅन, एमआरआयचे दर निश्चित

रुग्णालयांच्या दर्शनी भागांत दर प्रदर्शित करण्याचे राज्य सरकारचे निर्देश

    04-Nov-2026
Total Views |

CTScan 
मुंबई, 3 नाेव्हेंबर (आ.प्र.) :
शासकीय रुग्णालयांत पेट सीटी स्कॅन, सीटी स्कॅन आणि एमआरआय तपासणीसाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाते. त्यामुळे रुग्णांचा बऱ्याचदा गाेंधळ उडताे. रुग्णांची हाेणारी अडचण लक्षात घेत राज्य सरकारने शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांत सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर सुरू असलेल्या पेट-सीटी स्कॅन, सीटी स्कॅन व एमआरआयचे दर निश्चित केले आहेत. त्यानुसार पेट सीटी स्कॅनसाठी 10250 रुपये, तर सीटी स्कॅन काॅन्ट्रास्ट 420 रुपये आणि एमआरआय काॅन्ट्रास्टसाठी 950 रुपये इतका दर निश्चित केला आहे.
 
वैद्यकीय शिक्षण व संशाेधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांत पीपीपी तत्त्वावर उपलब्ध असलेल्या पेट-सीटी स्कॅन सेवांसाठी सशुल्क रुग्णांकडून आकारावयाच्या शुल्काचा स्पष्ट उल्लेख नव्हता. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला शुल्क आकारणी करताना अडचणी येत हाेत्या. महात्मा ज्याेतिराव फुले जन-आराेग्य याेजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आराेग्य याेजनेंतर्गत पीईटी-सीटी स्कॅनसाठी 20500 रुपये पॅकेज दर निश्चित आहे. या दराच्या 50 ट्नके सवलतीने म्हणजेच 10250 रुपये सशुल्क रुग्णांसाठी आकारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. हा दर पेट-सीटी स्कॅनच्या संपूर्ण तपासणीसाठी असून, त्यात एफडीजी आणि काॅन्ट्रास्ट शुल्काचाही समावेश आहे. त्यामुळे या तपासणीसाठी स्वतंत्रपणे काॅन्ट्रास्टचे शुल्क आकारता येणार नाही.
 
सीटी स्कॅन आणि एमआरआय तपासणीसाठी वापरण्यात येणाऱ्या काॅन्ट्रास्टचे दरही सरकारकडून निश्चित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाच्या स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेत प्राप्त झालेल्या किमान दरांचा आधार तयासाठी घेण्यात आला आहे. एमआरआय काॅन्ट्रास्टसाठी इतर राज्यांतील दरांचाही तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यानुसार गॅडाेलिनियम आधारित काॅन्ट्रास्टसाठी 950 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.
 
पीपीपी तत्त्वावरील सीटी स्कॅन, एमआरआय आणि पीईटी-सीटी स्कॅन सेवांचा लाभ घेणाऱ्या रुग्णांचे तीन प्रवर्गांत वर्गीकरण करण्यात आले आहे. यात माेफत रुग्ण, सशुल्क रुग्ण आणि प्रायाेजित अथवा संदर्भित रुग्णांचा समावेश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर संदर्भित केलेल्या रुग्णांची तपासणी पूर्णपणे माेफत करण्यात येणार आहे. सशुल्क रुग्ण प्रवर्गात माेफत सेवेस अपात्र असलेल्या, मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर संदर्भित केलेल्या रुग्णांचा समावेश असेल. प्रायाेजित अथवा संदर्भित रुग्ण म्हणजे अन्य रुग्णालयांमार्फत प्रायाेजित किंवा संदर्भित करण्यात आलेले रुग्ण. अशा रुग्णांकडून संबंधित पीपीपी सेवा पुरवठादारासाेबतच्या सवलत करारातील पूर्ण दरानुसार शुल्क स्वीकारले जाणार आहे.
 
काेणत्याही प्रवर्गातील रुग्णाने किंवा त्यांच्या नातेवाइकांनी तपासणीचे शुल्क पीपीपी सेवा पुरवठादाराला राेखीने, ऑनलाइन किंवा अन्य काेणत्याही पद्धतीने थेट देता कामा नये. रुग्णांकडून स्वीकारावयाचे सर्व शुल्क रुग्णालयाच्या देय कक्षामार्फत स्वीकारण्यात येणार आहेत. सेवा पुरवठादाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने रुग्ण अथवा नातेवाइकांकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे काेणतेही शुल्क स्वीकारल्याचे आढळल्यास कठाेर कारवाई करण्यात येणार आहे. निश्चित केलेले दरपत्रक आणि रुग्णांच्या तीन प्रवर्गांनुसार शुल्क आकारणीची कार्यपद्धती मराठी व इंग्रजीत रुग्णालयाच्या दर्शनी भागात ठळकपणे प्रदर्शित करण्याचे निर्देश रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांना देण्यात आले आहेत.