मुंबई, 2 नाेव्हेंबर (आ.प्र.) :
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अखंडित वीजपुरवठा करण्याच्या दृष्टीने संपूर्ण 508 किमीच्या मार्गावर 14 ट्रॅक्शन सबस्टेशन्स (टीएसएस) उभारण्यात येत आहेत. यापैकी गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील बिलिमाेरा येथील पहिले सबस्टेशन अंतिम टप्प्यात पाेहाेचले आहे. या सबस्टेशन्सच्या माध्यमातून ग्रीडमधून वीज घेऊन तिचे आवश्यक व्हाेल्टेजमध्ये रूपांतर केले जाणार असून, त्यानंतर बुलेट ट्रेनच्या ओव्हरहेड वायर यंत्रणेला वीजपुरवठा केला जाणार आहे.
बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात पाच, तर गुजरातेत नऊ ट्रॅक्शन सबस्टेशन्स निर्माण केली जात आहेत. राज्यात मुंबई, ठाणे, विरार, बाेईसर आणि ठाणे डेपाे येथे ही सबस्टेशन्स असतील. गुजरातेत वापी, बिलिमाेरा, सुरत, भडाेच, बडाेदा, आणंद, महेमदाबाद, अहमदाबाद आणि साबरमती डेपाे येथे ही उभारणी करण्यात येत आहे.
बिलिमाेरा येथील सुमारे 18 हजार चाैमी क्षेत्रफळावर उभारण्यात येणाऱ्या सबस्टेशनचे बांधकाम वेगाने सुरू आहे. कंट्राेल पॅनेल, चेंजओव्हर स्विच, ट्रान्सफाॅर्मर आणि सर्किट ब्रेकर इमारतीतील उपकरणांची स्थापना पूर्ण झाली आहे. तसेच सर्व गॅन्ट्री टाॅवर्स आणि बीम बसवण्याचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. सध्या उपकरणांच्या चाचण्या आणि कमिशनिंगशी संबंधित कामे सुरू आहेत.
गुजरातेतील सबस्टेशन्सना गुजरात एनर्जी ट्रान्समिशन काॅर्पाेरेशन लिमिटेडच्या (जीईटीसीओ) 220 केव्ही अंबेथा ग्रीड सबस्टेशनमधून वीजपुरवठा केला जाणार आहे. त्यानंतर अत्याधुनिक 2 बाय 25 केव्ही ट्रॅक्शन पाॅवर सप्लाय प्रणालीद्वारे व्हायाडक्टवर बसवण्यात आलेल्या ओव्हरहेड इक्विपमेंटला (ओएचई) वीज दिली जाईल. संपूर्ण वीजपुरवठा यंत्रणेचे केंद्रीकृत नियंत्रण केंद्रातून रिअल-टाइम माॅनिटरिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनच्या संचालनासाठी आवश्यक असलेल्या वीजपुरवठ्याचे नियंत्रण आणि देखरेख एकाच केंद्रातून करणे शक्य हाेणार आहे.
या प्रकल्पातील अनेक महत्त्वाचे विद्युत घटक आता देशातच तयार हाेत आहेत. ट्रान्सफाॅर्मर, ओएचई मास्टवरील क्राॅस-आर्म, ग्राऊंड वायर, प्राेटेक्शन वायर, फीडर वायर; तसेच ट्रॅक्शन पाॅवर सप्लाय आणि वितरण प्रणालीतील अनेक उपकरणांचे उत्पादन देशातच सुरू आहे. त्यामुळे उच्च-गती रेल्वे तंत्रज्ञानाचे देशांतर्गत हस्तांतर हाेऊन उद्याेगांना चालना, राेजगारनिर्मिती आणि आयातीवरील अवलंबित्व कमी हाेणार आहे.