मानवी मनाच्या कथा व व्यथा ज्या जीवनाच्या वेलीवर नांदतात त्या जीवनाचीच कथा श्रीसमर्थ माेठ्या वळणावळणांनी मांडत आहेत. त्यामध्ये आधुनिक समीक्षकांना अभिप्रेत असलेले धक्के, गाठ, निरगाठ सगळे आहे आणि अर्थातच त्या कथेमागे माणसाने षड्रिपूंच्या गाठीतून मु्नत व्हावे हीच श्रीसमर्थांची तळमळ आहे. ते म्हणतात की या पुत्रवियाेगामुळे झालेल्या दु:खामुळे ताे म्हणू लागला की मी असे काय पाप केले आहे? वाटल्यास देवाने माझे सर्व वैभव न्यावे पण मला संतान द्यावे. मानवी मनाची हीच गंमत आहे की, ज्यासाठी ते धावाधाव करते ते सुख मिळाल्यावर त्याला त्यातील वैय्यर्थ म्हणजे निरर्थकता उमजते आणि खरे सुख त्यात नाही हे त्याला कळून येते. मग ताे देवाची प्रार्थना करताे. नवस सायास करू लागताे. कधी निखाऱ्यावरून चालीन, तर कधी भुत्या करीन. कधी गळ टाेचीन असेही म्हणताे.
वेळप्रसंगी गाेसावी, वैदू, मांत्रिक, तांत्रिक यांच्याही मागे लागताे; पण त्यातही यश येत नाही, हे पाहून दु:खीकष्टी हाेताे आणि शेवटी कुलस्वामी खंडाेबा आणि कुलस्वामिनीला मनापासून दाेघेही शरण जाऊन करूणा भाकतात. या कथाविस्ताराचा दुसरा समास पूर्ण करताना श्रीसमर्थ म्हणतात की या त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न हाेऊन परमेश्वरी कृपेने त्यास संतान हाेते व ते आनंदून जातात. हा आनंदही चिरस्थायी ठरताे कां हे जाणण्यासाठी श्राेत्यांनी पुढील कथाभाग लक्षपूर्वक ऐकावा, असे सांगताना श्रीसमर्थांना ऐहिक सुख कधीही निरंतर आनंद देणारे नसते हेच सुचवावयाचे आहे!
- प्रा. अरुण गाेडबाेले,
माे. 9822016299