नाशिक रिंगरोडच्या फेरसर्वेक्षणाचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

बाधितांना योग्य मोबदला मिळणार

    09-Oct-2026
Total Views |
 
NashikHighwa
नाशिक, 8 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
नाशिक रिंगराेडच्या अलाइनमेंटवरून शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या आक्षेपांची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मखमलाबाद ते गाेवर्धन या मार्गाचे पुढील आठ दिवसांत फेरसर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. फेरसर्वेक्षण करताना शेतकऱ्यांची घरे, विहिरी, बाेअरवेल; तसेच शेतीचे कमीत कमी नुकसान हाेईल याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
 
मुख्यमंत्री फडणवीस आणि नाशिकचे पालक मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रिंगराेड आणि महामार्ग क्रमांक 29 बाधित शेतकऱ्यांची सुमारे दीड तास बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यात आली. रिंगराेडच्या अलाइनमेंटवरून गेल्या काही काळापासून शेतकऱ्यांकडून आक्षेप घेतले जात आहेत. गवळवाडीमार्गे पर्यायी अलाइनमेंटचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी मांडला. हा प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या याेग्य ठरल्यास त्याचा विचार करण्याची सकारात्मक भूमिका बैठकीत घेण्यात आली. गाेवर्धन, जलालपूर, महादेवपूर, बेळगाव ढगा, राजूर बहुला आदी ग्रामीण भागासाठी गुणांक दाेन, तर शहरी भागासाठी गुणांक एक या तरतुदीनुसार भूसंपादन करून याेग्य माेबदला देण्याचे निर्देश देण्यात आले. जिरायती आणि बागायती जमिनींचे वर्गीकरण करताना विहिरी, बाेअरवेल आणि प्रत्यक्ष पिकांची पाहणी करावी, अशी सूचनाही करण्यात आली. प्रत्येक गावातील 500 मीटरची मर्यादा, तसेच मागील तीन वर्षांतील उच्चतम खरेदी व्यवहारांचा विचार करून माेबदला निश्चित करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
 
महामार्ग क्रमांक 29च्या भूसंपादनातील कायदेशीर बाबी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तपासून कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले. महामार्गासाठी साडेतीन मीटर जागेचे अधिग्रहण झाले असतानाही रस्त्याच्या आखणीत चुका झाल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. या चुका दुरुस्त करून प्रत्यक्ष आवश्यक असलेल्या जागेचे भूसंपादन 2013च्या भूसंपादन कायद्यानुसार करावे आणि त्यानुसार याेग्य माेबदला द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.