महाराष्ट्राला केंद्राने विशेष मदत द्यावी : मुख्यमंत्री

दुष्काळी स्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती

    09-Oct-2026
Total Views |

CentralGovernment 
नवी दिल्ली, 8 ऑक्टाेबर (आ. प्र.) :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी शाह यांना महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीची आणि राज्य सरकार याबाबत करीत असलेल्या उपाययाेजनाची माहिती देऊन केंद्राकडून विशेष मदतीची मागणी केली. यासाेबतच मुख्यमंत्र्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी नागपूर विमानतळाच्या विस्तारीकरणासंदर्भात चर्चा केली. या चर्चेमुळे नागपूर विमानतळासाठी आवश्यक असणारी संरक्षण विभागाची 27 एकर जागा उपलब्ध हाेण्याचा मार्ग माेकळा झाला आहे.
 
मुख्यमंत्र्यांनी शाह यांच्यासाेबत झालेल्या भेटीत राज्य सरकारने केंद्राकडे पाठविलेल्या आगाऊ प्रस्तावाची प्रतही दिली. राज्यातील सुमारे 32 जिल्ह्यांत दुष्काळी स्थिती असून, जवळपास 80 टक्के तालुके दुष्काळाने बाधित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या स्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक महाराष्ट्रातील विविध भागांचा दाैरा करणार आहे. या पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर केला जाणार असून, राज्याने पाठवलेला प्रस्ताव आणि पथकाच्या अहवालाच्या आधारे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत मदतीबाबत निर्णय हाेणार आहे. केंद्राकडून महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत देण्यात येईल, अशी ग्वाही शाह यांनी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
मुख्यमंत्र्यांनी राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली. नागपूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीसाठी आवश्यक असलेल्या 27 एकर जागेचा प्रश्न या बैठकीत चर्चिला गेला. ही जागा सध्या हवाई दलाच्या ताब्यात आहे.
 
नवीन टर्मिनलच्या कामासाठी आवश्यक जागा तातडीने हस्तांतरित करण्यास हवाई दलाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. उर्वरित भागासाठी आवश्यक बांधकाम पूर्ण करून ताे भागही पुढे हस्तांतरित करण्यात येणार आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले हाेते.