काेल्हापूर, 7 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
काेल्हापूर विमानतळाची सध्याची 1930 मीटरची धावपट्टी दाेन टप्प्यांत वाढवून 3 हजार मीटरपर्यंत नेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ आणि पालक मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेत घेण्यात आला.
पहिल्या टप्प्यात धावपट्टी 2300 मीटर आणि दुसऱ्या टप्प्यात तीन हजार मीटर करण्याचे नियाेजन आहे. या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेले 64 एकर भूसंपादन पूर्ण झाले आहे; तसेच काेल्हापूर-हुपरी राज्यमार्गाच्या वळतीकरणासाठी 2.60 हेक्टर भूसंपादनासाठी राज्य शासनाने 290 काेटी 23 लाखांच्या सुधारित प्रशासकीय आणि वित्तीय मान्यतेला मंजुरी दिली.
या विकासाबराेबरच वैमानिक प्रशिक्षण केंद्र (फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन) उभारणीच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी पुढील आठवड्यात विमानतळावर सुरक्षितता मूल्यांकन प्रक्रिया सुरू हाेणार आहे. त्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (डीजीसीए) संबंधित विभागांची आणि त्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची मान्यता घेऊन प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. हे प्रस्तावित केंद्र विमानतळाच्या तामगावच्या बाजूला असल्याने तेथे स्वतंत्र सुरक्षा प्रवेशद्वार, क्ष-किरण तपासणी यंत्र, सुरक्षा बंदाेबस्त आदींसाठी 25 गुंठे जागा हस्तांतराचा प्रस्ताव प्राधिकरणाच्या मुख्यालयात सादर करण्यात आला आहे.
काेल्हापूर विमानतळावरून सध्या हैदराबाद, बंगळुरू आणि मुंबई अशी सेवा सुरू असून, प्रवासी संख्या 2018-19 मधील 17843 वरून 2024-24 मध्ये 1 लाख 57 हजार 320 पर्यंत वाढली आहे. भविष्यात दिल्ली, शिर्डी, नागपूर, इंदूरसह 18 शहरांना जाेडण्याचे आणि कार्गाे सेवा सुरू करण्याचे नियाेजन आहे; तसेच छत्रपती राजाराम महाराजांच्या नावाने विमानतळ नामकरणाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.