ई-पीक पाहणीमध्ये आंब्याच्या प्रमुख जाती नोंदवणार : राज्य सरकारचा निर्णय

हापूसची स्वतंत्रपणे नोंद

    08-Oct-2026
Total Views |
 
Hapus
रत्नागिरी, 7 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
काेकणची ओळख आणि बागायतदारांच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या हापूसची ई-पीक पाहणीत स्वतंत्र नाेंद करण्याचा मार्ग आता माेकळा झाला आहे. डीसीएस अ‍ॅपमध्ये हापूससह महाराष्ट्रातील प्रमुख आंबा जातींची स्वतंत्र नाेंद करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
 
चालू वर्षी ई-पीक पाहणीसाठी वापरण्यात येणाऱ्या डीसीएस अ‍ॅपमध्ये आंबा पिकाची नाेंद करताना हापूस, केशर, रत्ना, सिंधू, पायरी यांसारख्या प्रमुख जातींसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध नसल्याने शेतकरी हैराण झाले हाेते. हापूससाठी स्वतंत्र पर्याय नसल्यामुळे काेकण रुची या नावाने नाेंद करण्याचा पेच निर्माण झाला हाेता. या तांत्रिक अडचणींची दखल घेत उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रश्न उपस्थित केला हाेता. काेकण रुची या एकाच पर्यायामुळे प्रत्यक्ष लागवडीखाली असलेल्या विविध आंबा जातींची अचूक नाेंद हाेत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले हाेते. त्यावर शासनाकडून याबाबत तातडीने कार्यवाहीचा निर्णय घेण्यात आला आहे. डीसीएस अ‍ॅपमध्ये राज्यातील प्रमुख आंबा जातींचे स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये हापूस, केशर, रत्ना, सिंधू, पायरी यांचा समावेश आहे. तसेच काजू, नारळ, सुपारी या फळपिकांच्या विविध जातींची आवश्यक नाेंद करता यावी, यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली आहे.