श्री दासबोध नित्यपाठ

ऐसे पाप उदंड केले। शुभाशुभ नाही उरले ।।१।।

    06-Oct-2026
Total Views |
 
RamdasSwami
श्रीसमर्थ आपली बाेधप्रद कथा पुढे सांगताना म्हणतात की, कामविकाराने प्रेरित हाेऊन त्याने दुसरे लग्न केले. दुसरेपणाची पत्नी सुखी व्हावी म्हणून ताे पैसा पैसा करू लागताे.
 
अत्यंत चिक्कूपणे वागून खर्च हाेईल म्हणून वेळप्रसंगी स्वत:ही न जेवता राहाताे. पैशासाठी अगदी जीव टाकताे आणि काेणाशीही भांडणतंटा करायला मागेपुढे पाहात नाही.
 
नीती-अनीती, देव, धर्म, कुळाचार यांचा काहीही विचार न करता केवळ स्वार्थ हाच त्याचा एकमेव विचार बनताे. येथे श्रीसमर्थ एक गंमतीचे उदाहरण देतात. पूजेसाठी ब्राह्मण आणि जेवायला म्हणून काेणी सवाष्ण बाेलावण्याची सर्वत्र प्रथा आहे. जेव्हा याला तसे बाेलावण्याची वेळ येते तेव्हा ताे माहेरी आलेल्या बहिणीलाच सवाष्ण म्हणून आणि मेव्हण्यालाच ब्राह्मण म्हणून जेवण घालताे आणि दक्षिणा व जेवणाचा खर्च वाचविताे.
 
सर्व नीतीनियम साेडून वागताे. स्वत: चांगले वागत नाही आणि दुसरा सज्जनपणे वागत असेल तर हा त्यालाच नावे ठेवताे. साधुसंतांची निंदा करून, सर्वांशीच वाद करून, भांडणे करून वितुष्ट- ओढवून घेताे.
 
जगातील सर्व सुखे स्वत:लाच मिळावीत असा त्याचा आग्रह असताे. परद्रव्याच्या अभिलाषेने ताे लाेकांचा विश्वासघात करताे आणि वर त्यालाच हा व्यवहार आहे असे म्हणून त्याचे समर्थन करताे.