नवी मुंबई, 5 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
प्रधानमंत्री आवास याेजनेंतर्गत (पीएमएवाय) उपलब्ध आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) तसेच विनाईडब्ल्यूएस सदनिकांच्या विक्रीची याेजना सिडकाेने पुन्हा सुरू केली आहे. पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य पद्धतीने खारघर, तळाेजा, कळंबाेली आणि द्राेणागिरी येथील 500 ईडब्ल्यूएस आणि 2500 विना-ईडब्ल्यूएस अशा एकूण सुमारे तीन हजार सदनिका उपलब्ध करून देण्याचे नियाेजन आहे. इच्छुक अर्जदारांना उपलब्धतेनुसार आपल्या पसंतीची सदनिका थेट निवडून तिची नाेंदणी करता येणार आहे.
एफसीएफएस या याेजनेची सुरुवात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये करण्यात आली हाेती. तळाेजा आणि द्राेणागिरीतील या याेजनेतील सदनिकांच्या किमती आर्थिक वर्ष 2022-23 मधील दरांनुसार निश्चित करण्यात आल्या आहेत. सदनिकेची सर्व देयके प्राप्त झाल्यानंतर तातडीने ताबा देण्यात येणार असल्याचे सिडकाेने स्पष्ट केले आहे.
एफसीएफएस याेजनेंतर्गत ईडब्ल्यूएस सदनिकांची नाेंदणी करणाऱ्या पात्र अर्जदारांना केंद्राच्या पीएमएवाय- एमआयएस संकेतस्थळावर प्रधानमंत्री आवास याेजनेचे लाभार्थी म्हणून नाव जाेडण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यासाठी आधार क्रमांक जाेडणे आणि आवश्यकतेनुसार ओटीपीद्वारे पडताळणी करणे बंधनकारक आहे.
ईडब्ल्यूएस प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना केंद्राच्या याेजनेंतर्गत अडीच लाखांच्या अनुदानाचा लाभ मिळू शकताे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करून लाभार्थी जाेडणीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. लाभार्थी जाेडणीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून लागू अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकाेच्या जनसंपर्क विभागाच्या वरिष्ठ अधिकारी प्रिया रातांबे यांनी केले आहे.
तळाेजातील सेक्टर 21, 22, 27, 34, 36 आणि 37, खारघर सेक्टर 40, द्राेणागिरी सेक्टर 11 व 12 तसेच कळंबाेली सेक्टर 15 येथे सदनिका उपलब्ध आहेत. या सदनिकांपैकी अद्याप उपलब्ध असलेल्या सदनिकांची नाेंदणी एफसीएफएस पद्धतीने करण्यात येणार आहे.