काेल्हापूर, 5 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या नवरात्राेत्सवावर गतवर्षीप्रमाणे यंदाही एआय कॅमेऱ्यांची नजर असणार असून, त्याचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठाेड यांच्यासमाेर सादर करण्यात आले. गेल्या वर्षी आयआयटी मंडी यांच्या साॅफ्टवेअरचा वापर करण्यात आला हाेता. मात्र, यंदा आपत्ती व्यवस्थापनांतर्गत स्वतंत्र डीपीयू वापरला जाणार आहे. उत्सवात ताे भाडेतत्त्वावर आणला जाईल; पण आचारसंहिता संपताच देवस्थानकडून ही यंत्रणा खरेदी केली जाणार आहे.
नवरात्राेत्सवाच्या दहा दिवसांत 25 लाखांहून अधिक भाविक अंबाबाईचे दर्शन घेतात. या गर्दीवर नियंत्रणासाठी, रेकाॅर्डवरील गुन्हेगारांना शाेधण्यासाठी तसेच अनुचित प्रकार राेखण्यासाठी गेल्या वर्षी पहिल्यांदाच आयआयटी मंडीच्या सहकार्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना एआय तंत्रज्ञान जाेडण्यात आले. त्यात रेकाॅर्डवरील गुन्हेगारांचे छायाचित्र अपलाेड केले हाेते. गेल्या वर्षी यासह चाेरीचा प्रयत्न करत असलेल्या 20 गुन्हेगारांची ओळख एआय कॅमेऱ्यांद्वारे पटली हाेती. यंदाही या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे, मात्र आयआयटी मंडीऐवजी आपत्ती व्यवस्थापनाचे स्वतंत्र साॅफ्टवेअर (डीपीयू) वापरले जाणार आहे. यंदा ते भाडेतत्त्वावर घेतले जाईल; पण आचारसंहिता संपताच त्याची खरेदी केली जाईल. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमाेर या कॅमेऱ्यांचे प्रात्यक्षिक सादर केले.
निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी सुरक्षेसंबंधी यंत्रणेची बैठक घेतली. दरवर्षी पाेलीस, स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांचा समावेश करून मंदिराची सुरक्षा राखली जाते. यंदा जिल्हा प्रशासनाकडून हाेमगार्डचीही मागणी केली जाणार आहे.