मुंबई, 4 ऑक्टाेबर (आ. प्र.) :
मराठी भाषा केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्ज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे. विपुल शब्दसंपदा, समृद्ध साहित्यपरंपरा आणि विविध बाेलीभाषांचा वारसा लाभलेल्या मराठीला 21 व्या शतकात डिजिटल आणि ज्ञानभाषा म्हणून अधिक सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठीचा दैनंदिन व्यवहारातील वापर वाढवण्यासाेबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डिजिटल तंत्रज्ञान, क्वांटम काॅम्प्युटिंग, स्पेस टेक्नाॅलाॅजी आणि जैवतंत्रज्ञानासारख्या आधुनिक क्षेत्रांतही मराठीचा वापर वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आयाेजित अभिजात मराठी भाषा सप्ताह आणि अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस कार्यक्रमाचा श्रीमती नाथीबाई दामाेदर ठाकर्सी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी) पाटकर सभागृहात उत्साहात प्रारंभ झाला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, मुंबईच्या महापाैर रितू तावडे, विद्यापीठाच्या कुलगुरू डाॅ. हेमलता बागला, मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांच्यासह मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि मराठीप्रेमी उपस्थित हाेते. बाेलीभाषांमध्ये स्थानिक संस्कृती, लाेकपरंपरा आणि जीवनानुभव सामावलेले आहेत. त्यामुळे या बाेलींचे साहित्य, लाेकपरंपरा आणि भाषिक वैशिष्ट्ये जतन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मराठी एआयच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मराठीचा प्रभावी वापर वाढवणे, डिजिटल माध्यमांवर मराठीतील माहिती आणि ज्ञानसामग्री उपलब्ध करून देणे, तसेच ओटीटी प्लॅटफाॅर्म आणि साेशल मीडियावर दर्जेदार मराठी कंटेंट माेठ्या प्रमाणात निर्माण करणे गरजेचे असल्याचे मुक्यमंत्र्यांनी नमूद केले. जगातील 50 हून अधिक देशांत मराठीचा प्रचार आणि प्रसार वाढवण्याचा संकल्प असून, लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी केंद्र उभारण्याबराेबरच पुढील विश्व मराठी साहित्य संमेलनही लंडनमध्ये आयाेजित केले जाणार आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली.
मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. पुण्यातील डेक्कन युनिव्हर्सिटीत मराठीसाठी उत्कृष्टता केंद्र, लंडनमध्ये मराठी वैश्विक केंद्र, राज्यातील विविध बाेलीभाषांचे 100 काेश आणि नऊ ठिकाणी ङ्गमराठी काैशल्य विकास केंद्रफ उभारण्याचे काम सुरू आहे, अशी सामंत यांनी दिली. यावेळी मराठीचे काैतुक भाग2 या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर अभिजात मराठी, अभिमान मराठी या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आला.