सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती महत्त्वाची : शेलार

    05-Oct-2026
Total Views |

CyberSuraksha 
मुंबई, 4 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
शहरे, लहान गावे आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा ऑनलाइन वावर वाढत असताना त्यांना सायबर गुन्ह्यांच्या नवनवीन प्रकारांचा धाेका निर्माण हाेत आहे. त्यामुळे डिजिटल जनजागृती आणि डिजिटल स्वच्छता अधिक महत्त्वाची असून, भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांच्या संरक्षणासाठी जनजागृती हीच प्रभावी फायरवाॅल ठरू शकते, असे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.
 
डेटा सिक्युरिटी काैन्सिल ऑफ इंडियाच्या (डीएससीआय) सायबर सुरक्षा जनजागृती महिमेअंतर्गत देशव्यापी बी सायबर स्ट्रीट स्मार्ट माेहिमेचा प्रारंभ शेलार यांच्या हस्ते मुंबईतील बाॅम्बे स्टाॅक एक्स्चेंजमध्ये (बीएसई) झाला. महिनाभर चालणाऱ्या या माेहिमेत नागरिकांना दैनंदिन सायबर सुरक्षेच्या सवयींबाबत मार्गदर्शन करण्यासह कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने हाेणारी फसवणूक आणि वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी जागरूक करण्यात येणार आहे. माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले, की अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून नागरिकांना लक्ष्य करणारे सायबर धाेके वेगाने बदलत आहेत. या माेहिमांमधून डिजिटल धाेक्यांचे स्वरूप साेप्या पद्धतीने समजावून सांगितले जात असून, नागरिकांना व्यवहार्य सुरक्षाविषयक सवयी अंगीकारण्यासाठी सक्षम केले जात आहे. जगभरात सायबर सुरक्षा जनजागृती महिना म्हणून ऑक्टाेबर पाळला जाताे.
 
माेहिमेच्या प्रारंभानिमित्त बीएसईच्या पारंपरिक घंटानादाच्या धर्तीवर रिंग द बेल फाॅर सिक्युरिटी हा प्रतीकात्मक उपक्रम राबवण्यात आला. सुरक्षित सायबर अवकाशासाठी शासन आणि उद्याेग क्षेत्राची सामूहिक बांधिलकी यातून व्य्नत करण्यात आली. यावेळी माेहिमेच्या सायबर अँथमचेही अनावरण करण्यात आले.