नवरात्रोत्सवासाठी अंबाबाई मंदिरात स्वच्छता सुरू : आज गाभारा बंद

    05-Oct-2026
Total Views |

Kolhapur 
काेल्हापूर, 4 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्राेत्सवाचे पडघम वाजू लागले असून, त्याची सुरुवात स्वच्छतेच्या कामाने झाली. गेल्या 22 वर्षांपासून मुंबईच्या आय स्मार्ट कंपनीतर्फे यंदा ही सेवा दिली जात असून, मंदिरात सध्या पुरातत्व खात्याच्या वतीने सुरू असलेल्या संवर्धनाच्या कामामुळे स्वच्छतेच्या पद्धतीवर मर्यादा आल्या आहेत. साेमवारी गाभाऱ्याची स्वच्छता केली जाणार असल्याने अंबाबाईचे दर्शन बंद राहणार आहे.
 
अंबाबाई मंदिरात नवरात्राेत्सवाच्या तयारीला स्वच्छतेच्या कामाने सुरुवात झाली. त्यासाठी आय स्मार्ट कंपनीचे 22 कर्मचारी काेल्हापुरात दाखल झाले असून, 10 ऑक्टाेबरपर्यंत हे काम केले जाणार आहे.
 
सध्या मंदिर परिसरात संवर्धन व जतनाची कामे सुरू असल्याने पुरातत्व विभागाचे निकष आणि नियम पाळून स्वच्छता करावी लागते आहे. दरवर्षी पाण्याच्या फवारणीचा वेग अधिक असताे; मात्र यंदा ताे कमी ठेवूनही दर्जेदार स्वच्छता करणे हे आव्हान आहे.
 
पहिल्या टप्प्यात मंदिराचा बाह्य परिसर, आवारातील छाेटी मंदिरे आणि दीपमाळांची स्वच्छता केली जाईल. साेमवारी (5) मंदिराचा गाभारा स्वच्छ केला जाणार असून, त्यादिवशी देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन बंद राहील. भाविकांच्या साेयीसाठी सरस्वती मंदिरात अंबाबाईची उत्सवमूर्ती ठेवली जाईल. सायंकाळी 6 नंतर मूळ मूर्तीचा अभिषेक, आरती केल्यानंतर दर्शन पूर्ववत सुरू हाेईल.