मुंबई, 29 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने 391.02 काेटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. सप्टेंबरमधील प्रवासी सवलतींच्या प्रतिपूर्तीपाेटी हा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे परिवहन विभागाने सांगितले. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
एसटीतील सुमारे 83 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन साधारणतः दर महिन्याच्या सात ते दहा तारखेदरम्यान अदा केले जाते.
यंदा 6 नाेव्हेंबरपासून दिवाळीला सुरुवात हाेत असल्याने कर्मचाऱ्यांना सणापूर्वी वेतन मिळावे, यासाठी सरनाईक यांनी एसटीला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले हाेते. त्यानुसार परिवहन विभाग आणि एसटी प्रशासनाने शासनाकडून आवश्यक निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला.