ज्याचे ‘हवे’ पण जास्त असते ताे गरीब जाणावा, आणि ज्याचे हवेपण कमी असते ताे श्रीमंत जाणावा. परमार्थी म्हणजे भिकारी असे ज्याला वाटते त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही. ज्याला नेहमी समाधान वाटते ताेच खरा श्रीमंत. आमचा आधार पैशाचा. ताे आज आहे अन् उद्या नाही. पायाच जिथे डळमळीत तिथे इमारत कुठे पक्की हाेईल? ज्यामध्ये कर्म करीत असतानाच समाधान मिळते ताेच खरा पराेपकार, तेच खरे कर्तव्य हाेय.
श्रीमान् याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असणारा असा हाेऊ नये याची श्रीमंतांनी काळजी घ्यावी. खरे म्हणजे समाधान हाच खरा पैसा, हीच खरी श्रीमंती, हेच खरे भाग्य, आणि हेच खरे ऐश्वर्य हाेय. ज्याला समाधान जास्त, ताे जास्त भाग्यवान् समजावा. समाधान हे आपले आपल्याला घ्यायचे असते, दुसरा काेणी ते आपल्याला देऊ शकत नाही. खराेखर, समाधानासारखे औषधच नाही. ते मिळत नाही. म्हणून इतर औषधे घ्यावी लागतात.
काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान, शांती आणि आनंद मिळताे. पैलवानासारखा दिसणारा एक गृहस्थ हाेता, त्याला विचारले तर ताे म्हणाला, ‘अहाे, मला मधुमेह झाला आहे; मी आतून पाेखरला गेलाे आहे ! त्यापेक्षा तुम्ही बरे.’ खराेखर त्याचप्रमाणे पैशापासून प्राप्त हाेणाऱ्या ऐश्वर्याची अवस्था आहे. फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे. ते राजवाड्यामध्ये नाहीच नाही, पण ते झाेपडीमध्येही नसेल. असमाधान हा राेग सर्वांनाच असल्यामुळे राेगांच्या यादीतून त्याचे नावच निघून गेले आहे! सध्या जगात पुष्कळ सुधारणा झालेल्या आहेत, पण त्यांनी माणसाला समाधान मिळालेले नाही. जीवन सुखी न हाेता मनाला जिच्यामुळे हुरहुर लागते ती सुधारणा कसली? व्यक्ती काय किंवा समाज काय, यांची सुधारणा घडवून आणायला चित्त स्थिर झाले पाहिजे. चित्ताची ही स्थिरता धर्माशिवाय येणे शक्य नाही. हल्लीचे तत्त्वज्ञान नुसते अभ्यासी आहे, अनुभवाचे नाही; म्हणून त्याने खरे समाधान लाभणार नाही. खराेखर प्रत्येक जीवाला भगवंताची तळमळ लागली पाहिजे.
भगवंताशिवाय जाे राहताे त्याला सुखदु:ख येते; आणि सुख म्हणजे तरी काय, दु:खाची कमतरता ते सुख ! राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळावेसे वाटते; म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कमी आहे. पण कुणी असा विचार करीत नाही की, जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी हाेताे का ? याचे उत्तर ‘नाही’ असेच मिळते. ताजी जिलबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिळ्या जिलबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे. भगवंताचा आनंद हा उपाधिरहित आहे. हा आनंद मिळवायला भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामांत राहणे हा एकच उपाय आहे. नामस्मरणाच्या याेगाने आनंदाचा आणि समाधानाचा लाभ सहजी हाेताे यात शंकाच नाही.