वणी, 2 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र सप्तशृंग गड येथे माेठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेता गर्दी व्यवस्थापन, वाहतूक, पिण्याचे पाणी, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, आराेग्य व भाविकांच्या मूलभूत सुविधांचे आतापासूनच सूक्ष्म नियाेजन करावे, असे निर्देश नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयु्नत शेखर सिंह यांनी दिले.
कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने श्रीक्षेत्र सप्तशृंग गडावर कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित हाेते. नवरात्राेत्सवाच्या काळात सप्तशृंग गडावर दरवर्षी माेठ्या प्रमाणात भाविक येतात. स्थानिक प्रशासनाला गर्दी व्यवस्थापनाचा अनुभव असला तरी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य वाढीव गर्दीचा विचार करून अतिरिक्त मनुष्यबळ, वाहने व आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून ठेवावी. गडाची भाैगाेलिक रचना, रस्ते, वाहतूक, पार्किंग, तसेच भाविकांची सुरक्षित आणि सुरळीत ये-जा यांचे स्वतंत्र नियाेजन करावे, असे शेखर सिंह यांनी सांगितले. या कालावधीत निर्माण हाेणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण लक्षात घेऊन सध्याच्या कचरा निर्मितीचा बेसलाइन डेटा तयार करावा.
त्यानुसार अतिरिक्त मनुष्यबळ, डस्टबिन, कचरा संकलनासाठी वाहने, तात्पुरती साठवणूक व्यवस्था आणि कचऱ्याची शास्त्राेक्त विल्हेवाट यांचे नियाेजन करावे. आवश्यकतेनुसार तात्पुरती कचरा प्रक्रिया व्यवस्था उभारण्याची शक्यता तपासावी. निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करून त्यापासून अगरबत्ती, धूपबत्ती यांसारखी उत्पादने तयार करणाऱ्या संस्था किंवा स्टार्ट अप्सशी समन्वय साधावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.