मुंबई, 2 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
माझगाव डाॅक शिपबिल्डर्स लिमिटेडमधील सुमारे 3000 मुदतबद्ध कामगारांवर बेराेजगारीची टांगती तलवार राहू देणार नाही, असे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सांगितले.
वर्षानुवर्षे सेवा बजावणाऱ्या या अनुभवी कामगारांना ब्रेक न देता पुन्हा कामावर घेणे, त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी धाेरण आखणे, बेसिक वेतनातील तफावत दूर करून विशेष वेतनवाढ देणे आणि अमर्यादित वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे या प्रमुख मागण्यांबाबत अहिर यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.
कामगारांच्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत अहिर यांनी माझगाव डाॅक व्यवस्थापनाला तातडीने सूचना दिल्या. कामगारांच्या न्याय्य मागण्यांसंदर्भात आणि उपलब्ध र्नित पदांवर अनुभवी कामगारांना प्राधान्य देण्याबाबत केंद्रीय संरक्षण मंत्रालय आणि संबंधित वरिष्ठ पातळीवर तात्काळ सकारात्मक पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी व्यवस्थापनाला दिले. केंद्रीय स्तरावर सर्वपक्षीय खासदारही या संदर्भात भूमिका मांडत असल्याचे अहिर यांनी सांगितले.