दीक्षाभूमीवर साकारणार भीमसृष्टी : डॉ. हर्षदीप कांबळे

    03-Oct-2026
Total Views |

DikshaBhoomi 
नागपूर, 2 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
दीक्षाभूमीवर 20 ऑक्टाेबरला साजरा हाेणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन हा देशभरातील अनुयायांसाठी महत्त्वाचा साेहळा आहे. दीक्षाभूमी परिसरात निवासासाठी जर्मन हँगर तंत्रज्ञानावर आधारित निवारा कक्ष उभारण्यात येणार असून, त्यात पंखे, कुलर्स, प्रकाशयाेजना, तसेच अंथरुण- पांघरुणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
 
या निवारा कक्षांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याशी संबंधित नावे देण्यात येणार आहेत. निवारा कक्षांच्या परिसरात संविधान साहित्याची भीमसृष्टी उभारण्यात येणार आहे. या साेहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या लाखाे अनुयायांना आवश्यक साेयी-सुविधा वेळेत आणि सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी परस्पर समन्वयाने सूक्ष्म नियाेजन करावे, असे निर्देश सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डाॅ. हर्षदीप कांबळे यांनी दिले.
 
विभागीय आयुक्त कार्यालयात कामाच्या नियाेजनाचा डाॅ. कांबळे यांनी आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पाेलिस उपायुक्त संदीप पखाले, आदित्य मिरखेलकर, सिंगा रेड्डी, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगाेटे, प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित हाेते.
 
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार अनुयायांच्या साेयीसुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करून महाेत्सवाचे नियाेजन करावे, असे डाॅ. कांबळे यांनी सांगितले. पुरेसा औषधसाठा, वैद्यकीय कक्ष, माेबाइल हाॅस्पिटल आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात येतील. नियमित स्वच्छता, जंतुनाशक व डास प्रतिबंधक फवारणी, माेबाईल टाॅयलेट्स आणि कचराकुंड्यांची पुरेशी व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अनुयायांच्या सुरक्षिततेसाठी पाेलीस बंदाेबस्त, महिला सुरक्षा पथक, अग्निशमन दल आणि नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्यात येणार आहे.