राज्यातील पायाभूत प्रकल्पांसाठी औष्णिक राखेच्या वापराचा करार: मेघना बोर्डीकर

    26-Oct-2026
Total Views |
 
Prakalp
मुंबई, 25 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
औष्णिक विद्युत केंद्रांमधून निर्माण हाेणाऱ्या राखेचा शाश्वत वापर करून पर्यावरण संवर्धनासह राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी महानिर्मिती आणि राज्य रस्ते विकास महामंडळादरम्यान (एमएसआरडीसी) ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकाेरे- बाेर्डीकर यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार जानेवारी 2027 ते डिसेंबर 2028 या कालावधीत पूर्व महाराष्ट्रातील प्रस्तावित द्रुतगती मार्ग आणि खनिज वाहतूक मार्ग प्रकल्पांसाठी 6.17 काेटी टन राखेचा वापर प्रस्तावित आहे.
 
महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. आणि एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी महानिर्मितीचे संचालक अभय हरणे, कार्यकारी संचालक डाॅ. नितीन वाघ, एमएसआरडीसीचे मुख्य महाव्यवस्थापक नरेंद्र टाेके आदी उपस्थित हाेते. या करारामुळे महानिर्मितीच्या काेराडी, खापरखेडा आणि चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रांमधील राखेचा वापर राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी करण्यात येईल. दीर्घकालीन राख साठवणुकीशी संबंधित पर्यावरणीय जाेखीम कमी हाेण्यास हातभार लागेल. राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी राखेच्या शाश्वत वापराची व्यवस्था निर्माण हाेईल.