मुंबई, 23 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी) भारतीय गुणवत्ता परिषदेसाेबत (क्यूसीआय) करार केला आहे. या करारानुसार रेल्वेतील खानपान सेवा आणि स्थानकांवरील खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची स्वतंत्र तपासणी केली जाणार आहे.
खानपान सेवा; तसेच स्थानकांवरील खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची तपासणी काेणतीही पूर्वसूचना न देता केली जाणार आहे. दर तीन आणि सहा महिन्यांनी अशी तपासणी करण्याची तरतूद आहे. तपासणीदरम्यान भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या नियमांचे पालन केले जाते की नाही, याची विशेष पडताळणी केली जाईल, असे आयआरसीटीसीकडून सांगण्यात आले. यामुळे रेल्वे प्रवाशांना माेठा दिलासा मिळणार आहे.
तपासणी अधिकारी माेबाइल अॅपद्वारे तपासणी करतील. तपासणीचे ठिकाण, वेळ आणि छायाचित्रांची नाेंद करणे बंधनकारक असेल. तपासणी पूर्ण झाल्यानंतर 24 तासांच्या आत अहवाल सादर करावा लागेल. खानपान केंद्रात त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने केलेल्या सुधारणात्मक उपाययाेजनांवरही लक्ष ठेवले जाणार आहे.
तपासणीदरम्यान स्वयंपाकघर आणि अन्नपदार्थ साठवण्याच्या ठिकाणांची स्वच्छता, कीटक नियंत्रण; तसेच अन्न याेग्य तापमानात ठेवले जाते की नाही, याची पडताळणी केली जाईल. शाकाहारी आणि मांसाहारी कच्चे पदार्थ स्वतंत्रपणे ठेवण्याच्या नियमांचे पालन हाेतेय की नाही याचीही तपासणी हाेणार आहे. खानपान कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तंदुरुस्ती, आवश्यक सुरक्षा पाेशाख आणि वैय्नितक स्वच्छतेच्या नियमांचे पालन यांचीही तपासणी केली जाणार असल्याचे आयआरसीटीसीकडून सांगण्यात आले.