मातापित्यांच्या अलाेट प्रेमाची आठवण काढत ताे पुन्हा परदेशी गेला. देशात राहून जादा द्रव्य मिळत नाही. एकदा परदेशातील जास्त पैसे मिळवायची सवय लागली की मग साहजिकच दाेन्हीकडची तुलना हाेते आणि पुन्हा परदेशी जाऊन जास्त पैसे मिळविण्याची इच्छा हाेते. असे हाेताना आपण आजही पाहताे. अमेरिकेत नाेकरी करून डाॅलर मिळविणारा माणूस इथे आला की त्याला इथला रुपयातला पगार फारच कमी वाटताे आणि ताे पुन्हा अमेरिकेतील नाेकरीच्या मागे धावताे. तसाच या कथेतील माणूस पुन्हा विदेशी जाऊन काबाडकष्ट करू लागताे. तेथे थाेड्या काळात जास्त पैसे मिळवायचे व मग ते घेऊन पुन्हा घरी परत यायचे या विचाराने ताे खूप श्रम करत राहताे. दाेन चार वर्षांत पुरेसे द्रव्य गाठीस बांधताे आणि पुन्हा स्वदेशी परतताे.
इकडे येताे तर देशात महाप्रचंड दुष्काळ पडलेला असताे आणि सर्वच माणसांची परिस्थिती बिकट झालेली असते. घरी येऊन पाहताे तर मुलाबाळांची अन्नान्न दशा झालेली असते. त्या दशेचे श्रीसमर्थांनी केलेले वर्णन अतिशय करूण आहे. ते म्हणतात, काेणाची दृष्टी गेलेली असते, तर काेणाला कुपाेषणामुळे कापरे भरलेले असते. काेणाचे पाठ पाेट खंगून एक झालेले असते, तर काेणाच्या सर्वांगाला सूज आलेली असते.