रत्नागिरीच्या सागरी सुरक्षेसाठी एएलएच एमके-३ हेलिकॉप्टर

आता समुद्रावर राहणार तटरक्षक दलाची अत्याधुनिक हवाई नजर

    17-Oct-2026
Total Views |

Ratnagiri 
रत्नागिरी, 16 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
राज्याच्या संवेदनशील सागरी किनारपट्टीच्या सुरक्षेला बळ देण्यासाठी तटरक्षक दलाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रत्नागिरीतील काेस्ट गार्ड एअर स्टेशनच्या ताफ्यात अत्याधुनिक स्वदेशी बनावटीचे ‘एएलएच एमके-3’ हेलिकाॅप्टर दाखल झाले आहे. या हेलिकाॅप्टरच्या आगमनामुळे पश्चिम किनारपट्टीवरील सागरी देखरेख, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्याची क्षमता वाढणार आहे.
 
रत्नागिरीत अशाप्रकारची एकूण पाच हेलिकाॅप्टर तैनात केली जाणार असून, त्यातील हे पहिले आहे. काेस्ट गार्ड एअर स्टेशन येथे पारंपरिक स्वागत करण्यात आले.
 
एएलएच एमके-3 हे प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हलके हेलिकाॅप्टर आहे. त्यात इलेक्ट्राे-ऑप्टिकल पाॅड आणि स्वयंचलित ओळख प्रणालीचा समावेश आहे. या यंत्रणांमुळे समुद्रातील दूरवरच्या हालचालींचे निरीक्षण करणे, संशयास्पद लक्ष्यांची छायाचित्रे मिळवणे आणि त्यांची ओळख पटवणे अधिक प्रभावीपणे शक्य हाेईल. याशिवाय हेलिकाॅप्टरमध्ये 12.7 मिमी क्षमतेची हेवी मशीन गन बसवण्यात आली आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार सागरी सुरक्षा माेहिमांमध्ये कारवाईची क्षमताही या हेलिकाॅप्टरला प्राप्त झाली आहे. समुद्रातील बेकायदा हालचाली, संशयास्पद नाैका, सागरी घुसखाेरीचे संभाव्य धाेके आणि देशाच्या सागरी हितसंबंधांना बाधा पाेहाेचवणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी ही यंत्रणा उपयु्नत ठरणार आहे. विशेषतः राज्याच्या विस्तीर्ण आणि संवेदनशील किनारपट्टीवर नियमित हवाई गस्त घालणे, संशयित हालचालींची माहिती संकलित करणे आणि गरज भासल्यास तातडीने मदत पाेहाेचवणे यासाठी या हेलिकाॅप्टरचा उपयाेग हाेईल.
 
रत्नागिरीतील तटरक्षक दलाच्या 831 स्क्वाॅड्रनमध्ये तटरक्षक 875 या हेलिकाॅप्टरचा समावेश करण्यात आला आहे. या स्क्वाॅड्रनसाठी नियाेजित पाच एएलएच एमके-3 हेलिकाॅप्टरपैकी हे पहिले हेलिकाॅप्टर आहे. उर्वरित चार हेलिकाॅप्टरचा समावेश टप्प्याटप्प्याने करण्यात येईल. या पाचही हेलिकाॅप्टरच्या तैनातीमुळे तटरक्षक दलाच्या क्षेत्रातील हवाई माेहिमांना अधिक बळ मिळणार आहे.
 
या हेलिकाॅप्टरचा उपयाेग केवळ सागरी सुरक्षेपुरता मर्यादित राहणार नाही. समुद्रात अडकलेल्या मच्छिमारांचा शाेध घेणे, संकटात सापडलेल्या नाैकांना मदत करणे, शाेध व बचाव माेहिमा राबवणे तसेच समुद्रातील प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित कामांमध्येही त्याची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.