महाराष्ट्र-चेक प्रजासत्ताक उद्योगवाढीसाठी सहकार्य

चेक प्रजासत्ताक शिष्टमंडळाशी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे आवाहन

    17-Oct-2026
Total Views |
 
CMFadanvis
मुंबई, 16 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
भारतासह जागतिक बाजारपेठेसाठी चेक कंपन्यांनी अधिकाधिक चेक तंत्रज्ञानाची उत्पादन निर्मिती महाराष्ट्रात करावी. चेक कंपन्या आणि संस्थांनी ठाेस प्रस्ताव सादर केल्यास राज्य शासन त्यांना वेगाने सहकार्य करेल. महाराष्ट्र-चेक प्रजासत्ताक उद्याेग व गुंतवणूक भागीदारीचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सर्व सहकार्य करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
 
चेक प्रजासत्ताकचे उपपंतप्रधान व व्यापारमंत्री कॅराेल हॅवलाॅक व शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन महाराष्ट्रात उद्याेग क्षेत्रातील संधी आणि गुंतवणुकीबाबत चर्चा केली. यावेळी चेक प्रजासत्ताकच्या उद्याेग व व्यापार मंत्रालयाचे संचालक (युराेपेतर देश) रिचर्ड हृाव्हाती, उपपरराष्ट्र मंत्री मेरी शतारदाेव्हा, परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक शमारेक लिब्रिचिकी, महावाणिज्य दूत कातेरिना वाेव्हकाेव्हा, चेक दूतावासाच्या प्रभारी राजदूत कातेरिना पीटरसेन, चेक खाण तंत्रज्ञान क्षेत्राचे प्रतिनिधी डॅनियल वासेक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लाेकेश चंद्र, प्रधान सचिव डाॅ. श्रीकर परदेशी, प्रधान सचिव डाॅ. पी. अन्बळगन, सचिव डाॅ. राजेश गवांदे, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार काैस्तुभ धवसे उपस्थित हाेते.
 
प्रगत उत्पादन आणि वाहन क्षेत्रातील सहकार्याला माेठा वाव आहे. इलेक्ट्रिक वाहने, अचूक अभियांत्रिकी, यंत्रसामग्री, स्वयंचलन आणि वाहन उद्याेगाशी संबंधित टियर-वन व टियर-टू चेक पुरवठादारांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनासाेबत काम करण्यास आणि परस्पर सहकार्य पुढे नेण्यास चेक प्रजासत्ताक उत्सुक असल्याचे हॅवलाॅक यांनी सांगितले.
 
चेक प्रजासत्ताकातील कंपनी प्रतिनिधींनी त्यांच्या उत्पादन, तंत्रज्ञान आणि उपलब्ध काैशल्याची माहिती दिली. महाराष्ट्रातील ऊर्जा आणि खाण क्षेत्रातील सहकार्याच्या संधींबाबत झालेल्या चर्चेत हॅवलाॅक यांनी काेळशाची गुणवत्ता माेजणारे ऑनलाइन विश्लेषक, स्वयंचलित नमुना संकलन यंत्रणा, काेळसा मिश्रण व गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली आणि काेळसा साठ्यांमधील स्वयंप्रज्वलन राेखणाऱ्या औष्णिक दृश्य प्रणालींची माहिती दिली.