मुंबई, 15 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
राज्यातील महामार्गांवर हाेणाऱ्या गंभीर अपघातांतील जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचवण्यास मदत व्हावी, या उद्देशाने हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे नियाेजन करण्यात येत आहे. अपघातानंतरचा पहिला तास, म्हणजेच ‘गाेल्डन अवर’ जखमींच्या उपचारांच्या दृष्टीने महत्त्वाचा असताे. या निर्णायक काळात जखमींना तातडीने ट्राॅमा केअर सेंटरपर्यंत पाेहाेचवण्यासाठी हवाई रुग्णवाहिका सेवा प्रभावी ठरू शकते, अशी भूमिका परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली.
मंत्रालयातील बैठकीत सरनाईक बाेलत हाेते. बैठकीला आराेग्यमंत्री प्रकाश आबिटकर, गृहराज्यमंत्री याेगेश कदम, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, आराेग्य विभागाचे संचालक संजय काटकर, वाहतूक पाेलिस विभागाचे अधीक्षक डाॅ. सुनील भारद्वाज यांच्यासह माेटार वाहन विभाग, आराेग्य विभाग आणि पाेलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते. या प्रकल्पासाठी 15 नाेव्हेंबरपर्यंत प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करून तिला मंजुरी घेण्याचे नियाेजन आहे. नाेव्हेंबरअखेर उच्चाधिकार समितीची मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
या प्रक्रियेनंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे नियाेजन करण्यात आले आहे, असे सरनाईक यांनी सांगितले. समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गाेवा महामार्ग या महत्त्वाच्या मार्गांवर अपघातग्रस्तांना जलद वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याचे नियाेजन आहे. या यंत्रणेत हवाई रुग्णवाहिका सेवेची उपलब्धता, जखमींना सुरक्षितपणे ट्राॅमा केअर सेंटरपर्यंत पाेहाेचवण्याची कार्यपद्धती आणि विविध आपत्कालीन यंत्रणांमधील समन्वय यांवर विशेष भर देण्यात येणार आहे, असेही सरनाईक यांनी सांगितले.