काेल्हापूर, 15 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने काेल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी हात राखून पाणी वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी जनावरांच्या चारा व्यवस्थापन, तसेच पाणीबचत आणि पर्यावरणपूरक शेतीला प्राधान्य द्यावे. पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाेबतच कारखान्यांमध्ये पाण्याच्या पुनर्वापराचे प्रभावी नियाेजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठाेड यांनी दिले आहेत. उपलब्ध पाण्याचा याेग्य पद्धतीने वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
साखर कारखान्यांच्या आगामी गळीत हंगामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदारांची बैठक झाली. या बैठकीस साखर सहसंचालक उज्ज्वला पळस्कर, निवासी उपजिल्हाधिकरी गजानन गुरव, कृषी उपसंचालक नामदेव परीट, सहायक आयुक्त समाजकल्याण सचिन साळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ. प्रमाेद बाबर, तसेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे कार्यकारी व व्यवस्थापकीय संचालक उपस्थित हाेते. जिल्ह्यात पर्जन्याची तूट असल्याने संभाव्य चाराटंचाई टाळण्यासाठी साखर कारखान्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या चारा पिकांच्या उत्पादनाला प्राेत्साहन द्यावे.
शेतकऱ्यांना वेळेत बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियाेजन करावे, कारखान्यांबराेबर हाेणारे कामगार करार, तसेच वजन-काटे तपासणीवर संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कारखान्यांमध्ये वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी उपाययाेजना राबवाव्यात. आगामी हंगामात पाण्याचा काटकसरीने वापर करून उपलब्ध जलस्राेतांचे संवर्धन करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.