श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिरात पोलिसांचा एआय पॅटर्न !

    16-Oct-2026
Total Views |
 
Kolhapur
काेल्हापूर, 15 ऑ्नटाेबर (आ.प्र.) :
करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिराच्या नवरात्राैत्सवात देशभरातून आणि विशेषतः कर्नाटक सीमा भागातून येणाऱ्या 15 लाखांहून अधिक भाविकांच्या सुरक्षेसाठी काेल्हापूर पाेलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कडक बंदाेबस्त तैनात केला आहे. गर्दीचा फायदा घेऊन माेबाईल, पाकीट आणि दागिन्यांची चाेरी करणाऱ्या अट्टल चाेरट्यांचा बंदाेबस्त करण्यासाठी पाेलिसांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित फेशिअल रिकग्निशन (चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान) यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेत स्थानिक गुन्हे शाखेने महाराष्ट्र आणि कर्नाटकातील तडीपार, अट्टल घरफाेडे व चाेरीचे गुन्हे दाखल असलेल्या तब्बल 850 गुन्हेगारांचे फाेटाे (डेटाबेस) अपलाेड केले आहेत.
 
काेल्हापूरचे पाेलीस अधीक्षक नीलाेत्पल यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी यंत्रणेच्या साहाय्याने मंदिर परिसरावर 24 तास थेट नजर ठेवली जात आहे. मंदिरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा चेहरा प्रवेशद्वारावर बसवण्यात आलेले 22 एआय कॅमेरे स्कॅन करतात.
 
कॅमेऱ्याने टिपलेला चेहरा पाेलिसांच्या 850 गुन्हेगारांच्या डेटाबेसशी जुळल्यास कंट्राेल रूममध्ये तत्काळ अलर्ट मेसेज जनरेट हाेताे. हा अलर्ट मिळताच मंदिर परिसरात 24 तास तैनात असलेले साध्या वेषातील एलसीबी पाेलीस कर्मचारी संबंधित व्यक्तीला शाेधून त्याची तातडीने ओळख पटवून चाैकशी करतात. नवरात्राैत्सवात मंदिर परिसरात भुरट्या चाेऱ्या, पाकीटमारी, साेन्याचे दागिने आणि माेबाईल चाेरीच्या घटना घडतात. शेजारील कर्नाटक राज्यातूनही अनेक अट्टल चाेरटे गर्दीचा फायदा घेण्यासाठी काेल्हापुरात येतात. ही बाब लक्षात घेऊन पाेलिसांनी कर्नाटकातील रेकाॅर्डवरील गुन्हेगारांचाही या डेटाबेसमध्ये समावेश केला आहे. या आधुनिक एआय प्रणालीमुळे आणि पाेलिसांच्या सतर्कतेमुळे यंदा मंदिर आणि परिसरात चाेरीच्या घटनांमध्ये कमालीची घट झाली असल्याचे पाेलीस अधीक्षक नीलाेत्पल यांनी स्पष्ट केले आहे.