पंढरपूर, 15 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
पंढरीच्या वारीसाठी दरवर्षी मार्गस्थ हाेणाऱ्या लाखाे वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर आणि गतिमान करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या चाैपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) नऊ वेगवेगळ्या टप्प्यांत राबवण्यात येत असलेल्या या प्रकल्पाचे 95 ट्नके काम पूर्ण झाले असून, डिसेंबरअखेर दाेन्ही मार्ग वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने सज्ज करण्याचे नियाेजन आहे. या प्रकल्पामुळे पुणे, सातारा आणि साेलापूर जिल्ह्यांतील दळणवळणाला वेग येण्यासाेबतच शेतमाल वाहतूक व उद्याेगांना माेठी चालना मिळणार आहे.
हडपसर ते वाखरी अशा एकूण 234 किमीच्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गापैकी 225 किमी. रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गाचे विभाजन सहा टप्प्यांत करण्यात आले आहे,. दिवेघाट ते लाेणंद (54.5 किमी), धर्मपुरी ते खुडुस (39.2 किमी), खुडुस ते वाखरी (33.1 किमी) आणि वाखरी ते माेहाेळ (44.7 किमी) या चारही टप्प्यांतील कामे पूर्ण झाली आहेत. हडपसर ते दिवेघाट (13.35 किमी) दरम्यान अवघे 6 किमी, तर लाेणंद ते धर्मपुरी (49.4 किमी) टप्प्यातील केवळ 1 किमी. काम पूर्ण हाेणे बाकी आहे. पाटस ते ताेंडले या एकूण 130 किमीच्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गापैकी 123 किमीचे काम पूर्णत्वास गेले आहे. या मार्गावर तीन प्रमुख टप्पे आहेत. पाटस ते बारामती (41.3 किमी) हा टप्पा पूर्ण झाला आहे. बारामती ते इंदापूर (42.1 किमी) दरम्यानचे सुमारे 6 किमी. आणि इंदापूर ते ताेंडलेमधील (46.7 किमी) अवघे 1 किमीचे काम प्रगतिपथावर असल्याचे एनएचएआयकडून सांगण्यात आले.