परदेशी जाऊन कष्ट व शरीराचे हाल करून पैसे साठविल्यावर त्याला पुन्हा घरची ओढ लागते आणि मालकाला विचारून ताे पुन्हा परत येताे. तेव्हा मनीऑर्डर ड्राफ्ट वगैरेंची साेय नसताना मधल्या दाेन वर्षांत घरी काहीच पैसे पाठविले नसतात. त्यामुळे इकडे घरी पत्नी व मुलांची अन्नान्न दशा हाेऊन ती यालाच नावे ठेवत असतात. म्हणत असतात की, आम्हाला अशा माणसाच्या कुटुंबात देवाने का घातले? येथे श्रीसमर्थ जीवनातील आणखी एक सत्य सांगतात. ते म्हणतात, दुसऱ्याला काय कष्ट पडत आहेत हे न जाणता प्रत्येक जण केवळ स्वत:चेच सुख पाहताे आणि शेवटी आपल्या वृद्धापकाळी काेणीही आपल्या उपयाेगी पडत नाही.
इकडे हा पैसे घेऊन आल्यावर पत्नी व मुले त्याच्या हातातील गाठाेडे घेतात, त्यातील नवीन कपडे पाहून आनंदतात आणि म्हणतात की पैसे आणल्यामुळे आता आमचे दारिद्र्य संपले; पण हा आनंद थाेडेच दिवस टिकताे. त्यांना हे पैसे संपल्यावर पुढे काय हाेईल याची काळजी वाटू लागते आणि तेच म्हणू लागतात की हे पैसे येथे ठेवून त्याने पुन्हा परदेशी जावे व कष्ट करून द्रव्य आणावे. म्हणून श्रीसमर्थ मानवी स्वभावाचा रास्त निष्कर्ष काढतात की सगळी नातेवाईक मंडळी सुखाचे साेबती आहेत हे ओळखूनच माणसाने वागले पाहिजे. याच्या मनात मुलेबाळे व पत्नीला साेडून पुन्हा परदेशी जावयाचे नसले तरी या आग्रहापुढे त्याचे काही चालत नाही. आणि मन घट्ट करून ताे पुन्हा जावयास निघताे.