मुंबई, 14 ऑक्टाेबर (आ.प्र.) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत तयार केलेल्या ‘मुंबई वन’ अॅपला प्रवाशांची पसंती मिळत आहे. हे अॅप सुरू हाेऊन 8 ऑक्टाेबरला एक वर्ष पूर्ण झाले.
या एका वर्षाच्या कालावधीत या अॅपवरून एक काेटी 32 लाखांहून अधिक तिकिटांची नाेंदणी झाली. या अॅपचे नऊ लाख 19 हजार वापरकर्ते आहेत. मुंबई वन अॅपवरून मेट्राे, माेनाे, बेस्ट, रेल्वेचे तिकीट खरेदी करता येते. आता लवकरच या अॅपवरून प्रवाशांना विमान तिकिटाचे आरक्षणही करता येणार आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांना रेल्वे, बेस्ट, मेट्राेसह 11 सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांतील ई-तिकीट खरेदी करून प्रवास करता यावा, प्रवाशांना आता रांगेत उभे राहण्याची आणि प्रत्येक प्रवासासाठी वेगवेगळे तिकीट खरेदी करण्याची गरज लागू नये, यासाठी राज्य सरकारने एमएमआरडीएला एकात्मिक तिकीट प्रणाली विकसित करण्याचे निर्देश दिले हाेते. त्यानुसार एमएमआरडीएने मुंबई वन अॅप सुरू केले. या अॅपमुळे प्रवाशांचा प्रवास सुकर झाला आहे.
एका वर्षाच्या कालावधीत या अॅपवरून एक काेटी 32 लाख तिकिटांची नाेंदणी झाली. या अॅपचे नऊ लाख 19 हजारांहून अधिक नाेंदणीकृत वापरकर्ते असल्याची माहिती एमएमआरडीए महानगर आयु्नत डाॅ. संजय मुखर्जी यांनी दिली.
सध्या या अॅपवरून मुंबईतील सर्व मेट्राे मार्गिकांवरील प्रवासासह नवी मुंबई मेट्राे मार्गिकेवरील प्रवासासाठीचे तिकीट खरेदी करता येते. माेनाेरेल, उपनगरीय रेल्वे, बेस्ट, ठाणे महापालिका परिवहन (टीएमटी), मिरा-भाईंदर परिवहन (एमबीएमटी), कल्याण-डाेंबिवली महानगर परिवहन (केडीएमटी) व नवी मुंबई महानगर परिवहनच्या (एनएमएमटी) सेवांसाठीही अॅपचा वापर करता येताे. आता लवकरच या अॅपवरून विमान तिकिटाचे आरक्षणही करता येणार असल्याची घाेषणा डाॅ. मुखर्जी यांनी केली.