मुंबई, 14 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
महिला उद्याेजकतेला प्राेत्साहन देण्यासाठी राज्यात महिला उद्याेजकता हब स्थापन करण्यात येणार आहे. काैशल्य विकास विभागांतर्गत राज्य नाविन्यता साेसायटी आणि उदैती फाउंडेशनमध्ये याबाबत सामंजस्य करार करण्यात आला. या सहकार्याद्वारे महिला उद्याेजकांसाठी अधिक सक्षम वातावरण तयार करण्यासह महिलांना वित्तपुरवठा, बाजारपेठ व व्यवसाय साह्य मिळवून देण्यात येणार आहे. राज्य नाविन्यता साेसायटी व उदैती फाउंडेशन तांत्रिक व ज्ञान भागीदार म्हणून कार्य करणार असून, राज्यआधारित महिला स्टार्टअप हब स्थापन करण्यास मदत करणार आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास यामुळे चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्य्नत केला.
काैशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लाेढा यांच्या नेतृत्वात या विभागात नाविन्यता साेसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकांत पाटील आणि उदैती फाउंडेशनच्या संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा शर्मा गाेयल यांनी या करारावर स्वाक्षरी केली. हा हब राज्यातील स्टार्टअप परिसंस्थेत समन्वय साधणारे व्यासपीठ म्हणून काम करेल. महिलांच्या नेतृत्वाखालील उद्याेगांसाठी अॅक्सेलरेटर माॅडेल तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. या अॅक्सेलरेटरच्या माध्यमातून मार्गदर्शन, उद्याेग क्षेत्राची गरज, वित्तपुरवठ्याची उपलब्धता, बाजारपेठीय दुवे, राज्य व केंद्राच्या विविध याेजनांशी समन्वय साधून उदैती फाउंडेशन नाविन्यता साेसायटीला तांत्रिक सहाय्यही देणार आहे.
उदैती फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा शर्मा गाेयल म्हणाल्या, की या करारामुळे महिला आर्थिक सक्षमीकरणास मदत हाेणार आहे. राज्यभरातील महिलांच्या नेतृत्वाला प्राेत्साहन देऊन संस्थात्मक यंत्रणा मजबूत करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल.