उद्योगांच्या गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र आघाडीवर : मुख्यमंत्री फडणवीस

महाराष्ट्र-ब्रिटन भागीदारी शुभारंभ कार्यक्रम उत्साहात

    15-Oct-2026
Total Views |
 
DevendraFadanvis
मुंबई, 14 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
काैशल्य, भांडवल आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणाऱ्या ठाेस गुंतवणुकीसाठी राज्यात उत्कृष्ट परिसंस्था कार्यरत आहे. सर्वच क्षेत्रांतील उद्याेगांच्या गुंतवणुकीसाठी असलेल्या परिसंस्थेच्या निर्मितीत महाराष्ट्र सर्वात आघाडीवर आहे, अशा शब्दांत राज्याचे महत्त्व अधाेरेखित करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रिटनमधील संस्था आणि उद्याेजकांना राज्यात गुंतवणुकीचे आवाहन केले.
 
गुंतवणूकदारांचे प्रकल्प वेगाने पुढे नेण्यासाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व संबंधित यंत्रणांशी तातडीने समन्वय साधला जाईल. ब्रिटनमधील सचिव, महापाैर व अधिकाऱ्यांचा दाैरा केवळ औपचारिक भेट नसून, दाेन्ही देशांतील महत्त्वाकांक्षेचे प्रत्यक्ष व्यवसाय आणि करारांमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्र-ब्रिटन भागीदारी शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री बाेलत हाेते.
 
यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, उद्याेग विभागाचे प्रधान सचिव पी. अनबळगन, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार काैस्तुभ धवसे, ब्रिटनचे व्यवसाय, विज्ञान आणि व्यापार राज्य सचिव जाेनाथन रेनाॅल्ड्स आदी उपस्थित हाेते. ब्रिटिश उच्चस्तरीय शिष्टमंडळासाेबत झालेल्या द्विपक्षीय चर्चांनंतर विविध महत्त्वाच्या क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यासाठी महाराष्ट्र आणि ब्रिटनदरम्यान झालेल्या सामंजस्य कराराचे आदान प्रदान करण्यात आले.
 
ज्या ब्रिटिश कंपन्या भारतीय बाजारपेठेत प्रवेश करू इच्छितात, त्यांच्यासाठी महाराष्ट्र हे सर्वात नैसर्गिक आणि याेग्य ठिकाण आहे. राज्याची अर्थव्यवस्था नाॅर्वेपेक्षाही माेठी आहे. दाेन्ही बाजूंनी दाेन्ही देशांच्या प्रगतीला गती द्यावी, अशी अपेक्षा रेनाॅल्ड्स यांनी व्य्नत केली.