विधिमंडळाच्या अधिवेशन काळात मंत्र्यांकडून विविध आश्वासने दिली जातात. विचार करू, चाैकशी करू किंवा माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवू अशा विधानांचाही आश्वासनांत समावेश हाेत असल्याने ही सर्व आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित विभागांची आहे. त्यामुळे आश्वासनांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाने विशेष माेहीम राबवून ठराविक कालावधीत ही आश्वासने पूर्ण करावीत, असे आवाहन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले.
अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयातून कार्यवाही करावी आणि लाेकप्रतिनिधींच्या पत्रांना अंतिम उत्तर देण्याची दक्षता घ्यावी. लाेकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सर्व अधिकारी बांधील असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रश्नांची उत्तरे वेळेत देणे, आश्वासनांचा नियमित पाठपुरावा करणे आणि सभागृहातील कामकाजावेळी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक असते. एखाद्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी अन्य विभागाची माहिती आवश्यक असल्यास संबंधित विभागांनी थेट संवाद साधून समन्वय करावा.