एक वैश्विक सत्य सांगताना श्रीसमर्थ म्हणतात की खरं तर आपण राेज अन्न खाताे पण प्रत्यक्षात अन्न मिळविण्यासाठी आपण जी धावाधाव करताे त्यामध्ये अन्नच आपणास खाते अशी वस्तुस्थिती असते आणि अन्न मिळाले नाही तर आपली अन्नान्न दशा हाेईल अशी सदैव चिंता लागून माणसाचे मन व शरीर खंगतच जाते.
दारिद्र्याचे चटके आणि दु:ख मरणापेक्षाही वाईट असते आणि मग त्या परिस्थितीत माणसाची बुद्धी चालत नाही व ताे एका चुकीमागे दुसऱ्या चुका करीत राहताे. यासाठीच कवीने म्हटले आहे ‘‘दारिद्र्य मरण यातुनी मरण बरे बा, दरिद्रता खाेटी.’’ अशीच परिस्थिती त्या माणसाची कशी झाली ते सांगताना श्रीसमर्थ म्हणतात की, त्याला मुलींच्या लग्नापुरते तरी काेणी कर्ज देईल का ही चिंता लागते. बरं उघडपणे कर्ज मागायला जावे तर लाेक याला मुले पाेसायची अक्कल नाही तर जन्माला का घातली असे विचारतील ही भीती वाटते. तर काही वेळा हा कर्जबाजारी हाेऊन वडिलांचा नावलाैकिक धुळीला मिळवताेय, या प्रवादाची काळजी वाटते.
या सगळ्यात पूर्वी वाढलेले कर्ज फेडता येत नाही म्हणून देणेकऱ्यांचा तगादा लागून त्याची मन:स्थिती उद्विग्न हाेते. जवळच्या वस्तू गहाण पडतात. पत संपून जाते आणि अगदी दिवाळे निघायची वेळ येते.