पंढरपूर नगरपालिकेची स्वच्छतेतून विठ्ठल सेवा

सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक संस्थांसह नागरिक सहभागी

    13-Oct-2026
Total Views |

Pandharpur 
पंढरपूर, 12 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
चंद्रभागा वाळवंट व नदीकाठ परिसर स्वच्छ, सुंदर व निर्मळ ठेवण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेने अनाेखे अभियान सुरू केले आहे. ‘स्वच्छतेतून विठ्ठल सेवा’ या अभियानातून दर बुधवारी चंद्रभागा वाळवंट परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानास विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नाेंदवला.
 
या स्वच्छता अभियानातून 18 टन कचरा संकलित केल्याची माहिती मुख्याधिकारी महेश राेकडे यांनी दिली. वारकरी संप्रदायात वाळवंटाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या परिसरात अस्वच्छ, घाण, कपड्यांचा ढीग दिसून येत हाेता. प्रमुख यात्रेपूर्वी याची स्वच्छता हाेत हाेती. मात्र, कायमस्वरूपी उपाय हाेत नव्हता.
 
यावर पालिकेचे मुख्याधिकारी महेश राेकडे यांनी यासाठी लाेकसहभागातून हे अभियान राबवण्याचे ठरवले. त्यानुसार पंढरपूर नगरपरिषद, जाेगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्था, श्री विठ्ठल गुरुकुल शिक्षण संस्था, इस्काॅन; तसेच विठ्ठल रुक्मिणी सुखाचे जीवन, रेंदाळ (ता. हातकणंगले) यांच्या विद्यमाने अभियान राबवण्यात आले. या अभियानात संबंधित संस्थांचे पदाधिकारी, स्वयंसेवक, पंढरपूर नगरपरिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी; तसेच पदाधिकारी, नागरिकांनी उत्स्फूर्त भाग घेतला.
 
चंद्रभागा वाळवंट परिसरात राबवण्यात आलेल्या या विशेष स्वच्छता अभियानात माेठ्या प्रमाणावर कचरा संकलित करण्यात आला. अभियानादरम्यान 18 टन कचरा संकलित करून त्याची याेग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. आता यापुढे दर बुधवारी हे अभियान राबवण्यात येणार आहे.